‘मोक्का’तील आरोपीसह तिघांना अटक
पुणे (वर्तमान महाराष्ट्र): पुण्यात बेकायदेशीर हत्यारे बाळगणाऱ्यांवर पोलिसांकडून कडक कारवाई केली जात असून, येरवडा पोलिसांच्या तपास पथकाने गावठी पिस्तुलाची विक्री करण्याच्या तयारीत असलेल्या एका टोळीचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत पोलिसांनी मोक्क्याचा गुन्हा दाखल असलेल्या एका सराईत गुन्हेगारासह तिघांना बेड्या ठोकल्या आहेत. त्यांच्याकडून एक गावठी पिस्तूल, एक जिवंत काडतूस आणि दुचाकी असा एकूण ९० हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
येरवडा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश गित्ते यांनी हद्दीत गस्त घालून अवैध शस्त्रे बाळगणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार, २८ जुलै रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास पोलीस अंमलदार बालाजी सोगे यांना एका गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली. चव्हाण चौकाकडून मुळीक फार्मकडे जाणाऱ्या रस्त्यावरील मोकळ्या जागेत तीन संशयित तरुण थांबले असून, त्यांच्याकडे गावठी पिस्तूल असल्याची व ते कोणाचीतरी वाट पाहत असल्याची खात्रीलायक माहिती मिळाली.
या माहितीच्या आधारे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) केशव दिंडे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे प्रभारी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक किशोर बेरड आणि त्यांच्या पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत सापळा रचला. पोलिसांची चाहूल लागताच संशयित दुचाकीवरून पळून जाण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी त्यांना शिताफीने झडप घालून ताब्यात घेतले. त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडे ४० हजार रुपये किमतीचे एक देशी बनावटीचे पिस्तूल, ८०० रुपयांचे एक जिवंत काडतूस आणि ५० हजार रुपये किमतीची दुचाकी असा एकूण ९० हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल आढळून आला.
पोलिसांनी केलेल्या चौकशीत महेश अशोक कांबळे (वय २१, रा. भुगाव, पुणे), गणेश तुळशीराम पवार (वय २२, रा. नांदेड सिटी, पुणे) आणि यश चंद्रकांत उरणकर (वय २२, रा. पाषाण, पुणे) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे निष्पन्न झाली आहेत. आरोपी महेश कांबळे याने हे पिस्तूल विक्रीसाठी आणल्याची कबुली दिली आहे. विशेष म्हणजे, यातील गणेश पवार हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर हवेली व वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात खून, मारामारी, शस्त्रास्त्र बाळगणे आणि संघटित गुन्हेगारी (मोक्का) अंतर्गत अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. तसेच आरोपी महेश कांबळे याच्यावरही न-हे पोलीस ठाण्यात आर्म ॲक्टचा गुन्हा नोंद आहे.
याप्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात आर्म ॲक्ट कलम ३(२५), महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७(१) सह १३५ अन्वये गुन्हा दाखल (गु.र.नं. ३०२/२०२६) करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक किशोर बेरड करत आहेत.
सदरची उल्लेखनीय कामगिरी अपर पोलीस आयुक्त (पूर्व प्रादेशिक विभाग) मनोज पाटील, पोलीस उपायुक्त (परिमंडळ ४) चिलुमूला रजनिकांत, सहाय्यक पोलीस आयुक्त (येरवडा विभाग) सुनिल जैतापुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश गित्ते, पोलीस निरीक्षक (गुन्हे) केशव दिंडे, पोलीस उपनिरीक्षक किशोर बेरड, तसेच अंमलदार मुकुंद कोकणे, शैलेश वाबळे, बालाजी सोगे, संदिप जायभाये, नटराज सुतार, गणेश पालवे, साईनाथ म्हस्के, अनिल मऱ्हाळकर आणि सोमनाथ गायकवाड यांच्या पथकाने केली आहे.


















