Abhay salunkhe daru Bandi

शिरूर अनंतपाळ तालुक्यातील शिवपूर गावात राजरोसपणे सुरू असलेल्या अवैध देशी-विदेशी दारू विक्रीविरोधात ग्रामस्थांचा संताप अखेर उफाळून आला आहे. वारंवार तक्रारी करूनही पोलीस प्रशासनाने कारवाई न केल्याने, गुरुवारी शिवपूरमधील ५०० हून अधिक संतप्त महिला आणि पुरुषांनी थेट शिरूर अनंतपाळ पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला. या उग्र आंदोलनाचे नेतृत्व अभय साळुंखे यांनी केले.

आश्वासने हवेतच, संयमाचा बांध फुटला

​गेल्या तीन ते चार वर्षांपासून शिरूर अनंतपाळ-नळेगाव रस्त्यावरील शिवपूर शिवारात एका ढाब्यावर अवैध दारू विक्री सुरू आहे. या व्यसनामुळे गावातील अनेक तरुण आजारांचे बळी ठरले असून काहींना आपला जीवही गमवावा लागला आहे. यामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी २७ जून रोजी संबंधित ढाब्यावर मोर्चा काढून अंड्याचे ट्रे, फर्निचर आणि इतर साहित्य पेटवून दिले होते.

​त्यावेळी पोलिसांनी संबंधितांवर कठोर कारवाईचे आश्वासन दिले होते. मात्र, अनेक दिवस उलटूनही कारवाई शून्यच राहिल्याने गुरुवारी भर पावसात आणि पेरणीची कामे सोडून, डोळ्यांत अश्रू घेतलेल्या या महिलांनी थेट पोलीस ठाण्यावर धडक मारली व प्रशासनाला जाब विचारला.

234814

​संतप्त महिलांच्या आंदोलनाचे नेतृत्व करताना काँग्रेस जिल्हा अध्यक्ष अभय साळुंखे यांनी प्रशासनासमोर आक्रमकपणे गावकऱ्यांची बाजू मांडली. “या मायमाउल्यांसोबत एक लेकुरवाळा भाऊ म्हणून मी ठामपणे उभा आहे,” असा विश्वास त्यांनी दिला. पोलीस आणि तहसीलदार यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर, अवैध दारू विक्रीचे शेड हटवण्याबाबत कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात आल्याची माहिती साळुंखे यांनी दिली. एका रडणाऱ्या महिलेचे सांत्वन करत त्यांनी महिलांना आधार दिला.

कायमस्वरूपी बंदोबस्तासाठी थेट डीवायएसपींकडे धाव

​या गुंडांकडून भविष्यात गावकऱ्यांना होणारा त्रास टाळण्यासाठी आणि कायमस्वरूपी बंदोबस्त करण्यासाठी उद्या थेट डीवायएसपी (DYSP) साहेबांची भेट घेतली जाणार असल्याचे साळुंखे यांनी स्पष्ट केले. तसेच, गावातील परवानाधारक बार आणि दारू दुकानाविरोधातही मतदान घेऊन ते कायदेशीररित्या बंद करण्याचा मोठा निर्णय या महिलांनी घेतला आहे. शिवपूर हद्दीत यापुढे कोणत्याही प्रकारची दारू चालणार नाही, असा ठाम निर्धार या रणरागिणींनी व्यक्त केला असून, आता पोलीस प्रशासन खऱ्या अर्थाने कधी जागे होणार, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.