पिंपरी (वार्ताहर): वाकड परिसरात जिवे मारण्याची धमकी देऊन दहा वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा अत्यंत संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी ६५ वर्षीय नराधमाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून, शिवाजीनगर न्यायालयाने त्याला ३ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
रमजान बन्नूसाब बागवान (वय ६५, रा. ताथवडे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी पीडित मुलीच्या आईने पोलिसात फिर्याद दिली आहे. फिर्यादी महिलेच्या तीन मुली घरात असताना, त्यातील एक मुलगी भांडी घासत होती. याच संधीचा गैरफायदा घेऊन आरोपीने तिचे तोंड दाबले आणि तिला जबरदस्तीने घरात नेऊन चाकूकडून जिवे मारण्याची धमकी देत मे ते २७ जुलै २०२६ या कालावधीत तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केले. एवढेच नव्हे तर, पीडितेच्या चार वर्षांच्या लहान बहिणीलाही धमकावून अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
सतर्कतेमुळे प्रकार उघडकीस
पीडित मुलीला आरोपी नको त्या ठिकाणी घेऊन जात असताना हा संशयास्पद प्रकार एका स्थानिक महिलेच्या निदर्शनास आला. संबंधित महिलेने तत्काळ याबाबत सतर्कता दाखवत पीडित मुलीच्या पालकांना माहिती दिली. त्यानंतर हा गंभीर प्रकार उघडकीस आला, अशी माहिती सहायक पोलिस आयुक्त सुनील कुऱ्हाडे यांनी दिली.
पोलिस कोठडी मंजूर
या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आले होते. गुन्ह्याचा सखोल तपास करायचा असून, घटनास्थळा परिसरातील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासणे, आरोपीच्या लैंगिक सक्षमतेची चाचणी करणे आणि साक्षीदारांचे जबाब नोंदवणे आवश्यक आहे, असा युक्तिवाद विशेष सरकारी वकील नितीन कोंघे यांनी न्यायालयात केला. न्यायालयाने सरकारी वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य धरून आरोपी बागवान याला पोलिस कोठडी सुनावली आहे.













