27.9 C
Pune
बुधवार, ऑगस्ट 19, 2026

Buy now

spot_img
spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

Related News

पत्रकारांच्या हक्कांसाठी परभणीत एल्गार!

‘व्हॉईस ऑफ मीडिया’च्या संदीप काळेंचा सरकारला थेट इशारा

परभणी / विशेष प्रतिनिधी:

राज्यात, देशात आणि जगभरात पत्रकारांची सद्यस्थिती चिंताजनक असून त्यांच्या न्याय्य हक्कांसाठीचा लढा यापुढे अधिक तीव्र केला जाईल, असा स्पष्ट इशारा ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ (VOM) इंटरनॅशनल फोरमचे संस्थापक व आंतरराष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे यांनी दिला. परभणी येथे आयोजित महाराष्ट्र राज्य केडर कॅम्पच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. या व्यापक लढ्यात देशभरातील सर्व पत्रकारांनी सक्रियपणे सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

पत्रकारांवरील हल्ले आणि दबाव थांबवा!

संदीप काळे यांनी आपल्या भाषणात पत्रकारांच्या वाढत्या समस्यांवर तीव्र चिंता व्यक्त केली. ते म्हणाले की, “जगभरात पत्रकारांच्या हत्या, त्यांना तुरुंगात डांबणे आणि त्यांच्यावर होणारे अत्याचार वाढत आहेत. भारतात आणि विशेषतः महाराष्ट्रातही हे प्रमाण वाढले आहे. ‘पत्रकार संरक्षण कायद्याची’ प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याने पत्रकारांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. विविध कायद्यांचा गैरवापर करून पत्रकारांची गळचेपी करण्याचे प्रयत्न सरकारने तातडीने थांबवावेत.” सरकारने पत्रकारांच्या संरक्षणासाठी ठोस पावले न उचलल्यास ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ अधिक तीव्रतेने रस्त्यावर उतरून आंदोलन करेल. नुकतेच दिल्लीतील जंतर-मंतरवर झालेले आंदोलन याच लढ्याचा भाग असल्याचे काळे यांनी स्पष्ट केले.

पत्रकार सुरक्षित तरच लोकशाही बळकट: विशाल पाटील

यावेळी नवनिर्वाचित राज्य सरचिटणीस व संपादक विशाल पाटील यांनी उपस्थित पत्रकारांशी संवाद साधला. “पत्रकार हा केवळ बातमी देणारा नसून तो समाजाचा आरसा आहे. समाजातील अन्याय, अत्याचार आणि सामान्य नागरिकांच्या समस्या मांडण्याचे काम तो करतो. मात्र, बदलत्या डिजिटल युगात पत्रकारांना नव्या तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण, आर्थिक स्थैर्य आणि सामाजिक सुरक्षा मिळणे अत्यंत गरजेचे आहे. लोकशाही बळकट करण्यासाठी पत्रकार सुरक्षित असणे आवश्यक आहे,” असे मत विशाल पाटील यांनी व्यक्त केले. तसेच व्हॉईस ऑफ मीडियाच्या या लढ्याला आपला पूर्ण पाठिंबा असल्याचेही त्यांनी जाहीर केले.

संघटनात्मक कार्याचा आणि उपक्रमांचा आढावा

राष्ट्रीय अध्यक्ष अनिल मस्के यांनी संघटनेच्या माध्यमातून देशभर सुरू असलेल्या विविध प्रकल्पांची आणि उपक्रमांची माहिती दिली. सांगलीसह कोकण विभागात राबविण्यात येत असलेल्या पत्रकार कल्याणाच्या उपक्रमांचा त्यांनी विशेष आढावा मांडला. दिवसभर चाललेल्या या केडर कॅम्पमध्ये राज्यभरातून आलेल्या पत्रकारांनी आपापल्या जिल्ह्यातील कामाची माहिती दिली आणि आगामी काळातील संघटनात्मक नियोजनावर सविस्तर चर्चा केली.

​या कार्यक्रमात राष्ट्रीय अध्यक्ष अनिल मस्के, राष्ट्रीय कार्याध्यक्ष दिगंबर महाले, नवनिर्वाचित राज्य सरचिटणीस विशाल पाटील, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष विजय चोरडिया, अजितदादा कुंकुलोळ, नरेंद्र देशमुख यांचा विशेष सन्मान करण्यात आला. यावेळी कचरू सारडा, चेतन कात्रे, विभागीय अध्यक्ष सचिन मोहिते, गोरखनाथ मदने, डॉ. गणेश जोशी आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.