More

    आयुष्मान भारत कार्ड मोहीम स्तरावर उपलब्ध करून द्या; जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे निर्देश

    Published on:

    ​जिल्हाधिकाऱ्यांकडून आरोग्य विभागाचा आढावा; एकही नागरिक आरोग्य सुविधेपासून वंचित राहू नये यासाठी प्रशासनाला सक्त सूचना

    ​पुणे (वर्तमान महाराष्ट्र वृत्तसेवा):

    प्रत्येक नागरिकाला दर्जेदार आरोग्य सेवा मिळण्यासाठी आयुष्मान भारत कार्ड उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने ग्राम विकास, महसूल व आरोग्य विभागाने मोहीम स्वरूपात कार्यवाही करावी. तसेच केंद्र व राज्य शासनाच्या आरोग्य विषयक योजनांची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी करून आरोग्य सुविधेपासून एकही नागरिक वंचित राहणार नाही, याची दक्षता घेण्याचे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिले आहेत.

    ​जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आरोग्य विभागाच्या विविध विषयांबाबतच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अंबादास देवमाने, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रामचंद्र हंकारे यांच्यासह वैद्यकीय अधीक्षक, तालुका आरोग्य अधिकारी आणि विविध विभागांचे अधिकारी व समन्वयक उपस्थित होते.

    ​नागरिकांची नोंदणी व कार्ड वितरण गतीने करा

    276939

    जिल्हाधिकारी डुडी म्हणाले की, आयुष्मान भारत कार्डद्वारे पात्र कुटुंबांना दरवर्षी ५ लाख रुपयांपर्यंतचे मोफत उपचार मिळतात. या सुविधेचा लाभ नागरिकांना व्हावा यादृष्टीने राज्य व केंद्र शासन प्रयत्नशील आहे. त्याअनुषंगाने नागरिकांची नोंदणी व कार्ड वितरणाची कार्यवाही गतीने करावी. तसेच महात्मा जोतीराव फुले जन आरोग्य योजनेच्या निकषांनुसार जास्तीत जास्त रुग्णालये संलग्न करावीत. आरोग्य योजनांची माहिती घरोघरी पोहोचवण्यात आशा कार्यकर्त्यांची भूमिका महत्त्वाची असल्याने त्यांना त्यांचे भत्ते वेळेत देण्यात यावेत, अशा सूचनाही त्यांनी प्रशासनाला दिल्या.

    ​१०० टक्के लसीकरण आणि शुद्ध पाण्याचा पुरवठा

    ग्रामीण भागातील गरोदर महिलांची प्रसूती शासकीय आरोग्य केंद्रांमध्येच व्हावी, यासाठी त्यांना सर्व आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. पात्र बालकांचे व मुलींचे १०० टक्के एचपीव्हीसी (HPVC) लसीकरण पूर्ण करावे. राष्ट्रीय किशोर स्वास्थ्य कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासोबतच, केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार क्षयरोगमुक्त ग्राम करण्यावर भर देण्याचे त्यांनी स्पष्ट केले. पावसाळ्यात नागरिकांना शुद्ध पाणी मिळण्यासह कुष्ठरोग, कावीळ, क्षयरोग, मलेरिया, सिकलसेल आदी आजारांवर प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी जिल्हा शल्यचिकित्सक व आरोग्य अधिकाऱ्यांनी नियोजनबद्ध काम करावे. ग्रामीण भागातील आरोग्य सुविधांच्या बळकटीकरणासाठी निधीची कोणतीही कमतरता भासू दिली जाणार नाही, अशी ग्वाही डुडी यांनी दिली.

    ​आशा कार्यकर्त्यांची रिक्त पदे त्वरित भरा : गजानन पाटील

    यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनीही आरोग्य अधिकाऱ्यांना महत्त्वाच्या सूचना दिल्या. पात्र मुलींचे एचपीव्हीसी लसीकरण आणि पावसाळ्यातील कीटकजन्य आजारांवर प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी व्यापक जनजागृती करावी. तसेच आशा कार्यकर्त्यांची रिक्त पदे लवकरात लवकर भरावीत व प्रलंबित विषय मार्गी लावावेत, असे पाटील यांनी सांगितले.

    ​बैठकीच्या शेवटी डॉ. देवमाने व डॉ. हंकारे यांनी दिलेल्या सर्व सूचनांची प्रभावीपणे अंमलबजावणी केली जाईल व येत्या काळात आरोग्य विभागाच्या वतीने अधिकाधिक चांगले काम करण्यात येईल, अशी ग्वाही दिली.

    Related

    Leave a Reply

    Please enter your comment!
    Please enter your name here