१७ सप्टेंबर भगवान विश्वकर्मा जयंती ‘राष्ट्रीय श्रमिक दिन’ म्हणून घोषित करा: भारतीय मजदूर संघाची पंतप्रधानांकडे मागणी
पुणे जिल्हाधिकारी व तहसीलदारांमार्फत केंद्र सरकारला निवेदन सादर
पुणे (वर्तमान महाराष्ट्र वृत्तसेवा):
भगवान विश्वकर्मा जयंतीचा दिवस असलेला १७ सप्टेंबर हा अधिकृतपणे ‘राष्ट्रीय श्रमिक दिन’ म्हणून घोषित करण्यात यावा, अशी आग्रही मागणी भारतीय मजदूर संघ (पुणे जिल्हा) यांच्या वतीने करण्यात आली आहे. यासंदर्भात पुणे जिल्हाधिकारी कार्यालय तसेच जिल्ह्यातील विविध तहसीलदार कार्यालयांमार्फत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निवेदन पाठवण्यात आले.
पुणे येथील ‘विश्वकर्मा भवन’ या भारतीय मजदूर संघाच्या कार्यालयात भगवान विश्वकर्मा यांच्या प्रतिमेचे विधिवत पूजन करण्यात आले. याप्रसंगी वंचित, शोषित, कंत्राटी कामगारांसह सर्व घटकांतील श्रमिकांना न्याय, सामाजिक सुरक्षा आणि सन्मान मिळवून देण्यासाठी संघटितपणे काम करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. पुणे जिल्ह्यातील सरकारी, निमशासकीय, सार्वजनिक उपक्रम तसेच खासगी औद्योगिक आस्थापनांमध्येही हा दिवस उत्साहात साजरा करण्यात आला.
श्रम आणि कौशल्याचा राष्ट्रीय गौरव व्हावा
भगवान विश्वकर्मा हे निर्मिती, कौशल्य, तंत्रज्ञान, उद्योग आणि श्रमाचे प्रतीक मानले जातात. देशाच्या आर्थिक, औद्योगिक आणि पायाभूत उभारणीत कामगार, कारागीर, तंत्रज्ञ आणि अभियंत्यांचे योगदान मोलाचे आहे. श्रमिकांच्या या योगदानाचा राष्ट्रीय स्तरावर गौरव व्हावा, श्रमप्रतिष्ठेची भावना दृढ व्हावी आणि नव्या पिढीमध्ये कौशल्य व कष्टाविषयी आदर निर्माण व्हावा, यासाठी १७ सप्टेंबर हा दिवस केंद्र सरकारने अधिकृत ‘राष्ट्रीय श्रमिक दिन’ घोषित करावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली. “राष्ट्रहित, उद्योगहित व कामगारहित” या त्रिसूत्रीवर भारतीय मजदूर संघ अविरतपणे कार्यरत असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
प्रमुख पदाधिकाऱ्यांची उपस्थिती

या आंदोलनात्मक उपक्रमावेळी भारतीय मजदूर संघ पुणे जिल्ह्याचे अध्यक्ष अर्जुन चव्हाण, सचिव सागर पवार, संघटन सचिव बाळासाहेब भुजबळ, अखिल भारतीय ठेका मजदूर महासंघाचे सरचिटणीस सचिन मेंगाळे, मीडिया प्रभारी निलेश खेडकर, रवींद्र देशपांडे, जिल्हा उपाध्यक्ष मनोज भदारके, उमेश विश्वाद, श्रीमती बेबीराणी डे, राम सरवसे, यश निंबाळकर यांच्यासह जिल्ह्यातील विविध संलग्न कामगार संघटनांचे पदाधिकारी, कामगार प्रतिनिधी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.