मातोश्री गिरीजाबाई पाटील शाळा व डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यालयाचा उपक्रम
पुणे, धानोरी: विद्यार्थ्यांना सुरक्षित, पौष्टिक व संतुलित आहाराचे महत्त्व समजावे तसेच आरोग्यदायी जीवनशैलीबाबत जनजागृती व्हावी, या उद्देशाने सिद्धार्थ शिक्षण संस्था संचालित मातोश्री गिरीजाबाई पाटील प्राथमिक मराठी शाळा व डॉ. बाबासाहेब आंबेडकर माध्यमिक विद्यालय, भैरव नगर, धानोरी येथे अन्न सुरक्षा व संतुलित आहाराबाबत विशेष जनजागृती उपक्रम राबविण्यात आला.
शिक्षण विभाग, पुणे महानगरपालिका तसेच अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरणाच्या मार्गदर्शनानुसार शाळेत ‘संतुलित अन्न व संतुलित आहार’ या विषयावर माहितीपर फलक लावण्यात आला. या फलकाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना संतुलित आहाराची व्याख्या, आहारातील पोषक घटकांचे महत्त्व आणि दैनंदिन आहारात कोणत्या पदार्थांचा समावेश करावा, याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली.
धान्य, कडधान्ये, प्रथिने, फळे, भाज्या, दूध, दुग्धजन्य पदार्थ, फॅट्स, तेले आणि पाणी या प्रमुख अन्नघटकांचा योग्य प्रमाणात आहारात समावेश करणे आवश्यक असल्याचे विद्यार्थ्यांना सांगण्यात आले. सोबतच जंक फूड, अतिरिक्त साखर व मीठ असलेले पदार्थ, पॅकेज्ड व प्रक्रिया केलेले अन्न, शीतपेये तसेच तंबाखूजन्य पदार्थांपासून दूर राहण्याचे काटेकोर आवाहन करण्यात आले.
विद्यार्थ्यांनी सकस नाश्ता, फळे-भाज्यांचे सेवन, पुरेसे पाणी, स्वच्छतेच्या सवयी आणि नियमित शारीरिक व्यायाम आपल्या दैनंदिन जीवनात आणावा, असा संदेश देण्यात आला. ‘संतुलित आहार घ्या, निरोगी शरीर मिळवा आणि उज्ज्वल भविष्य घडवा!’ या घोषणेने आरोग्यदायी जीवनशैलीचे महत्त्व अधोरेखित केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका विद्या पाटील आणि प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक विजय श्रीवास्तव होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम पार पडला. यावेळी डॉ. आंबेडकर इंग्लिश मिडीयमच्या मुख्याध्यापिका अनामिका कुलकर्णी व शुभांगी काळगुडे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होत्या.
या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी मानसी पलांडे, तृप्ती कांबळे, योगेश बिंदगे, अर्चना बनछोड, सविता इमडे, सुखदा वाळंज, शारदा पाटोळे, रिया वाघ, मारुती पाटील, मनीषा चिंचणे, अंबादास कांबळे, रूपाली पवार, प्रिया शेलार, ममता चौधरी, सुप्रिया भारती, रमाताई डंबारे, गौतम बोरकडे आणि मुकेश विधाते यांच्यासह शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी सक्रिय सहकार्य केले. विद्यार्थ्यांमध्ये सुरक्षित अन्न, निरोगी शरीर, आनंदी जीवन आणि उज्ज्वल भविष्य याबाबत जागरूकता निर्माण करणारा हा प्रेरणादायी उपक्रम उत्साहात संपन्न झाला.
