सरन्यायाधीशांना प्रमुख पाहुणे करू नका’; ‘नालसार’ विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांचे कुलगुरूंना पत्र
हैदराबाद:
नॅशनल ॲकॅडमी ऑफ लीगल स्टडीज अँड रिसर्च (NALSAR), हैदराबादच्या पदवीधर बॅचच्या विद्यार्थ्यांनी विद्यापीठाला पत्र लिहून भारताचे सरन्यायाधीश (CJI) सूर्यकांत यांना त्यांच्या दीक्षान्त समारंभासाठी प्रमुख पाहुणे म्हणून बोलावण्याच्या निर्णयावर पुनर्विचार करण्याची मागणी केली आहे.
२३ जुलै रोजी विद्यापीठाचे कुलगुरू, कुलसचिव आणि प्राध्यापकांना हे निवेदन सादर करण्यात आले आहे. दीक्षान्त समारंभाची तारीख अद्याप निश्चित झालेली नाही आणि प्रमुख पाहुण्यांची निवड अद्याप चर्चेत असतानाच, कोणताही निर्णय घेण्यापूर्वी आपली मते विचारात घेतली जावीत, अशी विद्यार्थ्यांची भूमिका आहे.
काय आहे विद्यार्थ्यांचा आक्षेप?
विद्यार्थ्यांचा मुख्य आक्षेप २० जुलै रोजी जंतरमंतरवर झालेल्या “चलो संसद” मार्चमधील आंदोलकांवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सरन्यायाधीशांच्या नेतृत्वाखालील सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने दिलेल्या प्रतिक्रियेवर आहे. निवेदनानुसार, २२ जुलै रोजी एका वकिलाने तातडीच्या सुनावणीसाठी या प्रकरणाचा उल्लेख केला असता, सरन्यायाधीशांनी वकिलाला म्हटले होते, “आमचा वेळ वाया घालवू नका, आणि तुमचाही वेळ वाया घालवू नका.”
जेव्हा वकिलाने कथित पोलिस कारवाईचे व्हिडिओ पुरावे दाखवण्याची तयारी दर्शवली, तेव्हा सरन्यायाधीशांनी स्पष्ट केले की, “आम्हाला व्हिडिओ पाहण्यात रस नाही; आमच्याकडे पाहण्यासाठी वेळ नाही.”
विद्यार्थ्यांनी सरन्यायाधीशांसमोर आधीच प्रलंबित असलेल्या एका स्वतंत्र पत्र याचिकेचाही संदर्भ दिला आहे. या याचिकेत २० जुलैच्या पोलिस कारवाईत सर्वोच्च न्यायालयाने स्वतःहून (suo motu) हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे. या कारवाईत महिला आणि लहान मुलांसह १७० हून अधिक आंदोलक जखमी झाले असून, ‘डी. के. बसू विरुद्ध पश्चिम बंगाल राज्य’ या खटल्यात घालून दिलेल्या सुरक्षा नियमांचे उल्लंघन झाल्याचा दावा या याचिकेत करण्यात आला आहे.
“संविधानिक मूल्यांची जपणूक व्हावी”
दीक्षान्त समारंभाचे महत्त्व विषद करताना विद्यार्थ्यांनी पत्रात लिहिले आहे की, हा असा क्षण असावा जिथे विद्यापीठाची मूल्ये, विशेषतः “संविधानिक हक्क, न्यायाची सुलभता आणि तक्रारींची योग्य दखल घेण्याची बांधिलकी” या निवडीतून दिसून यावी. आंदोलन करणाऱ्या नागरिकांवर पोलिसांच्या क्रूरतेच्या गंभीर आरोपांकडे दुर्लक्ष करणाऱ्या मान्यवरांच्या हस्ते पदवी स्वीकारणे योग्य वाटत नसल्याचे विद्यार्थ्यांनी म्हटले आहे.
विद्यापीठाने प्रमुख पाहुण्यांच्या निवडीवर पुनर्विचार करावा आणि अंतिम निर्णय घेण्यापूर्वी किंवा निमंत्रण देण्यापूर्वी पदवीधर बॅचशी सल्लामसलत करावी, अशी विनंती विद्यार्थ्यांनी केली आहे. विद्यार्थी प्रतिनिधींसोबत बैठक घेऊन किंवा विद्यापीठाला योग्य वाटेल अशा इतर कोणत्याही माध्यमातून या विषयावर अधिक चर्चा करण्याची आपली तयारी असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
या निवेदनावर २०२६ च्या पदवीधर बॅचच्या सुमारे ७० विद्यार्थ्यांनी स्वाक्षऱ्या केल्या आहेत. दोन दिवसांनंतर, २०२७ ते २०३१ च्या बॅचमधील सुमारे ३८० हून अधिक विद्यार्थ्यांनी याला पाठिंबा दिला. दरम्यान, अद्याप नालसारने दीक्षान्त समारंभाची तारीख जाहीर केलेली नाही किंवा सरन्यायाधीशांच्या उपस्थितीला दुजोरा दिलेला नाही.



















