More

    घरकुल योजनेच्या मस्टरसाठी ३ हजारांची लाच; बनसारोळ्याचा ग्रामरोजगार सेवक ‘एसीबी’च्या जाळ्यात

    Published on:

    ​प्रति मस्टर १०० रुपयांची केली होती मागणी; बीड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची धडक कारवाई

    ​वार्ता संकलन: राजकुमार धिवार

    ​बनसारोळा:

    पंतप्रधान (पीएम) घरकुल योजनेअंतर्गत मस्टरचे पैसे काढून देण्याच्या मोबदल्यात तीन हजार रुपयांची लाच स्वीकारताना बनसारोळा (ता. केज, जि. बीड) येथील ग्रामपंचायतीच्या ग्रामरोजगार सेवकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (ACB) पथकाने रंगेहाथ पकडले आहे. गोविंद सोपान गोरे (वय ५०, रा. बनसारोळा, ता. केज, जि. बीड) असे कारवाई करण्यात आलेल्या लाचखोर ग्रामरोजगार सेवकाचे नाव असून, या कारवाईमुळे केज तालुक्यातील ग्रामपंचायत वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

    ​प्रति मस्टर १०० रुपयांची मागणी

    मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदाराला पीएम घरकुल योजनेअंतर्गत त्यांच्या कामाच्या मस्टरचे पैसे काढायचे होते. हे पैसे काढून देण्यासाठी ग्रामरोजगार सेवक गोविंद गोरे याने तक्रारदाराकडे प्रति मस्टर १०० रुपये याप्रमाणे एकूण ३० मस्टरसाठी ३ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. शासकीय कामासाठी पैशांची मागणी होत असल्याने, तक्रारदाराने तत्काळ बीड एसीबीकडे धाव घेत यासंदर्भात अधिकृत तक्रार नोंदवली.

    ​बनेश्वर मंदिराजवळ रचला सापळा

    तक्रार प्राप्त झाल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने या तक्रारीची गोपनीय पद्धतीने पडताळणी केली. या पडताळणीत गोविंद गोरे याने लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर एसीबीच्या पथकाने बनसारोळा येथील बनेश्वर मंदिराजवळ सापळा रचला. यावेळी तक्रारदाराकडून तीन हजार रुपयांची लाच स्वीकारताना एसीबीच्या पथकाने गोविंद गोरे याला रंगेहाथ ताब्यात घेतले.

    ​युसुफवडगाव पोलिसांत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया

    ही धडक कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, बीडचे पोलीस उपअधीक्षक सोपान चिटमपल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली एसीबीच्या पथकाने केली. या प्रकरणी युसुफवडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे.

    Related

    Leave a Reply

    Please enter your comment!
    Please enter your name here