दिल्ली दंगल कट प्रकरण: जामिनासाठी उमर खालिदची पुन्हा उच्च न्यायालयात धाव
नवी दिल्ली (वृत्तसंस्था):
२०२० च्या दिल्ली दंगल कट प्रकरणात (Delhi Riots Conspiracy Case) तुरुंगात असलेला विद्यार्थी नेता उमर खालिद याने जामिनासाठी पुन्हा एकदा दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. या याचिकेवर ३१ जुलै रोजी न्यायमूर्ती प्रतिभा एम. सिंह आणि न्यायमूर्ती विकास महाजन यांच्या खंडपीठासमोर सुनावणी होणार आहे.
कनिष्ठ न्यायालयाने फेटाळला होता जामीन:
यापूर्वी ४ जुलै रोजी कनिष्ठ न्यायालयाने उमर खालिदचा जामीन अर्ज फेटाळला होता. सर्वोच्च न्यायालयाने जानेवारी २०२६ मध्ये दिलेल्या आदेशाचे पालन करणे बंधनकारक असल्याचे सांगत कनिष्ठ न्यायालयाने हा निर्णय दिला होता. जोपर्यंत खटल्यातील संरक्षित साक्षीदारांची तपासणी पूर्ण होत नाही किंवा सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाला एक वर्ष पूर्ण होत नाही, तोपर्यंत नवीन जामीन अर्जावर विचार करता येणार नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले होते. त्यामुळे कनिष्ठ न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळून लावला होता.
अंतरिम जामिनाचीही मागणी:
खालिदने उच्च न्यायालयात नियमित जामिनाबरोबरच अंतरिम जामिनासाठीही (Interim Bail) अर्ज केला आहे. ‘युएपीए’ (UAPA) कायद्यातील कलम ४३डी(५) च्या कठोर अटी आणि घटनेतील कलम २१ (जगण्याचा आणि वैयक्तिक स्वातंत्र्याचा अधिकार) या अधिकारांच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयात एका महत्त्वाच्या कायदेशीर मुद्द्यावर निर्णय येणे बाकी आहे. जोपर्यंत सर्वोच्च न्यायालय यावर निर्णय देत नाही, तोपर्यंत आपल्याला अंतरिम जामीन देण्यात यावा, अशी मागणी उमर खालिदने केली आहे.
सुनावणीत प्रगती नाही; ६ वर्षांपासून तुरुंगात:
आपण जवळपास ६ वर्षांपासून तुरुंगात आहोत. सर्वोच्च न्यायालयाने जामीन नाकारून ६ महिन्यांहून अधिक काळ लोटला असला तरी, खटल्याच्या सुनावणीत अद्याप कोणतीही ठोस प्रगती झालेली नाही. तसेच, आरोपनिश्चितीवरील युक्तिवादही अपूर्ण असल्याचे खालिदने आपल्या अर्जात नमूद केले आहे. अलिकडेच सर्वोच्च न्यायालयाच्या एका खंडपीठाने उमर खालिद आणि सहआरोपींना जामीन नाकारल्याच्या जानेवारीतील निर्णयाबाबत काही कायदेशीर प्रश्न उपस्थित केले होते, त्यानंतरच खालिदने पुन्हा उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले आहेत.
