जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचा निर्णय; जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांची धडक कारवाई

तळेगाव दाभाडे (विशेष प्रतिनिधी):

तळेगाव शहरात राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा झटका बसला आहे. जात प्रमाणपत्र अवैध ठरल्यामुळे निवडणुकीसाठी आवश्यक असणारी पात्रता रद्द झाली असून, मजनू नाटेकर यांचे नगरसेवक पद रद्द करण्यात आले आहे. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांचे नगरसेवक पद रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

जात प्रमाणपत्र अवैध घोषित

तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक १० ‘अ’ मधील राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे नगरसेवक मजनू ऊर्फ मदन हनुमंत नाटेकर यांचे नगरसेवक पद रद्द करण्यात आले आहे. जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने त्यांचा जातीचा दावा अमान्य ठरवून जात प्रमाणपत्र अवैध घोषित केले. त्यानंतर जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी निवडणूक आयोगाच्या परिपत्रकानुसार मंगळवारी (दि. ४) ही कारवाई केली. या आदेशानुसार मजनू नाटेकर यांचे पद रद्द करण्यात आले असून, त्याची प्रत तळेगाव दाभाडे नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांकडे पुढील कार्यवाहीसाठी पाठविण्यात आली आहे.

सुनावणी आणि समितीचा निकाल

  • ​जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे अध्यक्ष अमोल यादव, सदस्य सचिव शिवकांत चिकुर्ते आणि सदस्य संजय दाणे यांनी नाटेकर यांच्या जात वैधतेच्या प्रकरणाची सुनावणी केली.
  • ​या सुनावणीत त्यांचा जातीचा दावा अमान्य ठरविण्यात आला.
  • ​त्यानंतर संबंधित उपविभागीय अधिकाऱ्यांनी त्यांचे जात प्रमाणपत्रही अवैध घोषित केले.

राखीव जागेवरून लढवली होती निवडणूक

मजनू नाटेकर यांनी तळेगाव दाभाडे नगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक १० ‘अ’ मधून राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) च्या उमेदवार म्हणून निवडणूक लढविली होती. ही जागा अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव होती. या निवडणुकीत त्यांच्याविरोधात करुणा प्रकाश सरोदे यांनी अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला होता. आता जात प्रमाणपत्र अवैध ठरल्यामुळे निवडणुकीसाठी आवश्यक पात्रता रद्द झाली असून, त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी नगरसेवकपद रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.