उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्याकडून श्रद्धांजली
मुंबई, दिनांक १८ जुलै: ज्येष्ठ समाजवादी विचारवंत, गांधीवादी नेते आणि तरुण पिढीला दिशा देणारे मार्गदर्शक डॉ. कुमार सप्तर्षी यांचे आज निधन झाले. त्यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या सामाजिक आणि राजकीय चळवळीतील एक झुंजार व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेले आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी त्यांच्या निधनावर शोक व्यक्त करत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे.
डॉ. सप्तर्षी यांनी आपले संपूर्ण आयुष्य शोषित आणि वंचित घटकांच्या हक्कांसाठी लढा देण्यात खर्ची घातले. ‘युवक क्रांती दला’च्या (युक्रांद) माध्यमातून त्यांनी तरुणाईमध्ये सामाजिक जाणीव निर्माण करून त्यांना एक नवी ऊर्जा दिली होती. अच्युतराव पटवर्धन, एस. एम. जोशी आणि ना. ग. गोरे यांच्यासारख्या दिग्गज समाजवादी नेत्यांच्या परंपरेतील डॉ. सप्तर्षी हे महात्मा गांधी आणि जयप्रकाश नारायण यांच्या विचारांचे कट्टर पाईक होते. विविध सामाजिक आंदोलनांतील त्यांच्या सक्रिय सहभागामुळे त्यांना एक ‘सत्याग्रही’ म्हणून मोठी ओळख मिळाली होती.
त्यांच्या लेखणीतून आणि प्रभावी भाषणांतून त्यांनी अनेक पिढ्यांना प्रेरित केले. सामाजिक बांधिलकी आणि साधेपणा ही त्यांची जीवनमूल्ये सर्वांसाठी आदर्शवत होती. विधानपरिषदेचे सदस्य असताना त्यांनी सभागृहात आपल्या अभ्यासू वृत्तीने छाप पाडली, तर रस्त्यावरच्या लढाईतही ते नेहमी अग्रभागी असत. डॉ. सप्तर्षी यांच्या जाण्याने गांधीवादी विचारांचा एक मोठा आधार हरपला असून, त्यांच्या कुटुंबीयांना आणि सहकाऱ्यांना हे दुःख सहन करण्याची शक्ती मिळो, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या आहेत.