पुणे: मार्च महिना संपता संपता पुणेकरांना कडाक्याच्या उन्हापासून दिलासा मिळाला असला तरी, आज दुपारी झालेल्या अवकाळी पावसाने शहराची दाणादाण उडवली. हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार, आज सोमवार, ३० मार्च रोजी दुपारी २:३० च्या सुमारास अचानक ढगांच्या गडगडाटासह पावसाने हजेरी लावली. विशेषतः महाळुंगे आणि हिंजवडी आयटी पार्क परिसरात मोठ्या प्रमाणात गारपीट झाल्याने रस्त्यांवर पांढरा शुभ्र थर साचला होता.

दुपारीच पसरला काळोख

दुपारी २ वाजल्यापासूनच आकाशात काळ्या ढगांनी गर्दी केली होती. अवघ्या काही मिनिटांतच विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली. बालेवाडी, महाळुंगे आणि परिसरात पावसाचा जोर इतका प्रचंड होता की, काही अंतरावरील दृश्यमानता (Visibility) पूर्णपणे कमी झाली होती. रस्त्यावरून धावणाऱ्या वाहनांना भर दुपारी हेडलाईट्स सुरू करून प्रवास करावा लागला.

गारपिटीने झोडपले

IMG_Garpeeth Pune - Vartman Maharashtra
चित्रांकन: वर्तमान महाराष्ट्र

पावसासोबतच बोराच्या आकाराच्या गारा पडल्याने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. अनेक दुचाकीस्वारांनी मेट्रो ब्रिज किंवा झाडांचा आसरा घेतला. महाळुंगे परिसरातील रस्त्यांवर गारांचा खच पडल्याचे चित्र पाहायला मिळाले. अचानक आलेल्या या पावसामुळे सखल भागात पाणी साचले असून वाहतुकीचा वेगही मंदावला होता.

शेतकरी चिंतेत

पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात आणि घाट परिसरातही पावसाने हजेरी लावली आहे. सध्या रब्बी पिकांची काढणी अंतिम टप्प्यात असतानाच या अवकाळी पावसाने आणि गारपिटीने हजेरी लावल्याने पिकांचे मोठे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. बागायती पिकांसह आंब्याच्या मोहरालाही याचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.

पुढील २४ तास सतर्कतेचे

हवामान विभागाने पुणे जिल्ह्यासाठी आधीच ‘येलो अलर्ट’ जारी केला होता. पुढील २४ ते ४८ तास मध्य महाराष्ट्र आणि घाट माथ्यावर ढगाळ वातावरण राहून काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. नागरिकांनी विजा कडकडत असताना झाडाखाली किंवा मोकळ्या जागेत थांबू नये, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

संपादन: आर. आर. उजगरे

वृत्त विभाग, वर्तमान महाराष्ट्र