More

    ठाकरे कुटुंबीय केवळ सत्ता आणि पक्षासाठी मराठी अस्मितेचा वापर करतात; सुजात आंबेडकरांचा घणाघाती आरोप

    Published on:

    ​मुंबई: “मराठी माणसाच्या नावावर राजकारण करणारे ठाकरे कुटुंब हे मराठी माणसांसाठी नाही, तर स्वतःचा पक्ष वाचवण्यासाठी राजकारण करत आहे. जेव्हा यांचा पक्ष ‘व्हेंटिलेटर’वर असतो, तेव्हाच यांना मराठी अस्मिता आठवते,” अशा शब्दात वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी ठाकरे गटावर जोरदार टीकास्त्र सोडले आहे.

    ​मोहित कंबोजच्या घरच्या कार्यक्रमावरून निशाणा

    सुजात आंबेडकर यांनी आदित्य ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या भाजप नेते मोहित कंबोज यांच्या मुलीच्या वाढदिवसाला उपस्थित राहण्यावरून सवाल उपस्थित केला आहे. “भाजपचा ब्रोकर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आणि महाविकास आघाडीचे सरकार पाडून शिवसेना आमदारांना गुवाहाटीला पळवण्यात हात असणाऱ्या मोहित कंबोजच्या घरच्या कार्यक्रमाला हे दोन्ही नेते आवर्जून उपस्थित होते. ही कसली मराठी अस्मिता?” असा सवाल त्यांनी केला.

    ​२५ वर्षांच्या सत्तेत मराठी माणसाचे काय झाले?

    मुंबई महानगरपालिकेत २५ वर्षे सत्तेत असणाऱ्या उद्धव ठाकरे यांनी मराठी माणसासाठी नक्की काय केले, असा प्रश्न विचारत सुजात आंबेडकरांनी काही टोकदार मुद्दे मांडले आहेत:

    • ​मुंबईत मराठी माणूस हद्दपार होत असताना सत्ताधाऱ्यांनी काय केले?
    • ​महापालिकेत किती मराठी कॉन्ट्रॅक्टर किंवा उद्योगपती निर्माण केले?
    • ​मराठी अस्मितेच्या गप्पा मारणाऱ्यांनी किती मराठी शाळा उघडल्या?

    ​राजकीय सोयीनुसार भूमिका बदलल्याचा आरोप

    बाळासाहेब ठाकरे यांनी दक्षिण भारतीयांविरोधात ‘हटाव लुंगी’चे आंदोलन केले होते, मात्र आज आदित्य ठाकरे मतांसाठी लुंगी घालून फिरत आहेत. जेव्हा गुजराती मतांची गरज होती, तेव्हा ‘केम छो वरली’ म्हणत लोटांगण घातले आणि आता पक्ष अडचणीत आल्यावर पुन्हा मराठी अस्मितेचे राजकारण सुरू केले, अशी टीका त्यांनी केली.

    ​चैत्यभूमीवरील गर्दीवेळी ‘अस्मिता’ कुठे जाते?

    ६ डिसेंबरला महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमीवर येणारा जनसमुदायही मराठीच असतो. मात्र, त्यावेळी शिवाजी पार्क परिसरात राहणारे राज ठाकरे आणि त्यांचे नातेवाईक मुंबई सोडून बाहेर का जातात? असा खडा सवाल करत सुजात आंबेडकरांनी ठाकरेंच्या भूमिकेतील दांभिकतेवर बोट ठेवले आहे. “अशा भामट्या लोकांपासून सावध राहा,” असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

    Related

    Leave a Reply

    Please enter your comment!
    Please enter your name here