विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवरून राहुल गांधींचा सरकारवर हल्लाबोल
नवी दिल्ली :
देशातील शिक्षण आणि परीक्षा व्यवस्थेच्या गोंधळाविरोधात रस्त्यावर उतरलेल्या विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवरून लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. “विद्यार्थ्यांवर लाठीमार करणे त्वरित थांबवावे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याप्रकरणी माफी मागावी,” अशी आक्रमक मागणी राहुल गांधी यांनी केली आहे.
राहुल गांधी यांनी लोकसभा अध्यक्षांची भेट घेऊन संसदेत विद्यार्थ्यांच्या या ज्वलंत प्रश्नावर चर्चा करण्याची मागणी केली. मात्र, यावर लोकसभा अध्यक्षांनी चर्चेसाठी सरकारची ‘परवानगी’ घ्यावी लागेल, असे उत्तर दिल्याचे राहुल गांधी यांनी सांगितले.
या संदर्भात तीव्र संताप व्यक्त करताना गांधी म्हणाले की, “हा विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी जोडलेला अत्यंत गंभीर मुद्दा आहे. देशभरात उद्ध्वस्त झालेली शिक्षण आणि परीक्षा व्यवस्था याविरोधात युवा वर्ग प्रदर्शन करत आहे. मात्र, त्यांचे प्रश्न ऐकून घेण्याऐवजी त्यांना मारहाण केली जात आहे, हे अजिबात योग्य नाही. नरेंद्र मोदी यांनी यासाठी अद्याप माफीदेखील मागितलेली नाही.”
तसेच, पंतप्रधानांच्या मौनावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत ते म्हणाले, “पंतप्रधान या विषयावर गप्प का आहेत? त्यांनी विद्यार्थ्यांची माफी मागायला हवी आणि त्यांना मारहाण करण्याचा हा प्रकार थांबवला पाहिजे.” संसदेबाहेर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न केला.













