sharad-pawar-narendra-modi-meeting
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शरद पवार (संग्रहित छायाचित्र).

विशेष प्रतिनिधी | वर्तमान महाराष्ट्र

नवी दिल्ली/मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नुकतीच घेतलेली भेट आणि त्यानंतर त्यांनी समाजमाध्यमांवर (सोशल मीडिया) दिलेली माहिती यामध्ये मोठा विरोधाभास समोर आला आहे. पवारांनी पंतप्रधानांना दिलेले अधिकृत पत्र पूर्णपणे ‘शेती’ प्रश्नावर आधारित असताना, त्यांच्या सोशल मीडिया पोस्टमध्ये मात्र ‘नीट’ (NEET) परीक्षा आणि विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर सविस्तर चर्चा झाल्याचा दावा करण्यात आला आहे. पत्रात नसलेला विषय पोस्टमध्ये कसा आला? राजकीय नॅरेटिव्ह सेट करण्यासाठी आणि सहानुभूती लाटण्यासाठी हा जाणीवपूर्वक केलेला प्रकार आहे का? असे संतप्त सवाल आता उपस्थित केले जात आहेत.

नेमका दावा काय?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीनंतर शरद पवार यांच्या अधिकृत सोशल मीडिया खात्यावरून एक पोस्ट शेअर करण्यात आली. या मजकुरात स्पष्टपणे म्हटले आहे की, बैठकीत ‘नीट’ (NEET) परीक्षेतील पेपरफुटी, विद्यार्थ्यांचे आंदोलन, त्यांच्यावर दाखल झालेले गुन्हे आणि शिक्षण क्षेत्रातील प्रश्नांवर पंतप्रधानांशी सविस्तर चर्चा केली. या बैठकीसाठी पवारांसोबत खासदार सुप्रिया सुळे उपस्थित होत्या. या सर्व प्रश्नांवर सकारात्मक आणि ठोस उपाययोजना करण्याचे आश्वासन पंतप्रधानांनी दिले, असा दावा या पोस्टमध्ये करण्यात आला आहे.

पत्रात मात्र ‘नीट’चा मागमूसही नाही!

बैठकीत सुप्रिया सुळे उपस्थित होत्या हे जरी फोटोवरून स्पष्ट होत असले तरी, चर्चेच्या विषयांबाबत मात्र मोठी तफावत स्वतः शरद पवार यांनीच जोडलेल्या अधिकृत पत्रातून उघड झाली आहे. २२ जुलै २०२६ रोजीचे हे दोन पानांचे पत्र पंतप्रधानांना उद्देशून लिहिलेले आहे. या पत्राचे सविस्तर वाचन केले असता, हे पत्र केवळ ‘महाराष्ट्रातील कृषी व जल क्षेत्रातील प्रशासकीय त्रुटी आणि शेतकऱ्यांच्या गंभीर समस्या’ याच विषयावर केंद्रित असल्याचे स्पष्ट होते. या संपूर्ण पत्रात नीट परीक्षा, पेपरफुटी किंवा विद्यार्थ्यांच्या प्रश्नांचा साधा नामोल्लेखही नाही. शिवाय, पत्राचा शेवट केवळ ‘अशी विनम्र अपेक्षा आहे’ असा असताना, पोस्टमध्ये मात्र पंतप्रधानांनी ‘ठोस आश्वासन दिले’ असा दावा करण्यात आला आहे.

श्रेयवादासाठी दिशाभूल?

सध्या देशभरात ‘नीट’ पेपरफुटी आणि विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा मुद्दा अत्यंत संवेदनशील बनला आहे. अशा वेळी विद्यार्थ्यांची सहानुभूती मिळवण्यासाठी पत्रात नसलेले विषय सोशल मीडियाच्या मजकुरात जाणीवपूर्वक घुसडण्यात आले का, हा प्रश्न निर्माण झाला आहे. पंतप्रधानांना एका विषयाचे पत्र द्यायचे आणि बाहेर येऊन भलत्याच ज्वलंत विषयाचे श्रेय लाटायचे, हा राजकीय दुटप्पीपणा असल्याचे उघड झाले आहे.

​देशातील दोन सर्वोच्च नेत्यांच्या भेटीचा तपशील देताना सोशल मीडियावरील मजकूर आणि अधिकृत कागदपत्रे यात एवढी मोठी तफावत असणे, हे राजकीय पारदर्शकतेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण करणारे आहे. एका ज्वलंत प्रश्नाचे अधिकृत पत्रात अस्तित्व नसताना त्याचे सोशल मीडियावर श्रेय घेण्याच्या या प्रकारावर संबंधित नेत्यांकडून काही स्पष्टीकरण दिले जाणार का? याकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.