वर्तमान महाराष्ट्र प्रतिनिधी
पुणे : खाडी देशांतील तणावपूर्ण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर कुवैतमध्ये अडकलेल्या सुमारे ३०० भारतीय कामगारांसाठी एक अत्यंत दिलासादायक बातमी समोर आली आहे. अखिल भारतीय ठेका मजदूर महासंघ (भारतीय मजदूर संघ संलग्न) यांनी केलेल्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे आणि भारत सरकार व भारतीय दूतावासाच्या तातडीच्या हस्तक्षेपातून या कामगारांच्या सुरक्षित स्वदेश परतीची प्रक्रिया आता सुरू झाली आहे. पहिल्या टप्प्यात ४८ कामगारांचा जत्था लवकरच भारताकडे रवाना होणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कुवैतमधील एका कंपनीने १० ते २४ फेब्रुवारी दरम्यान सुमारे ३०० भारतीय कामगारांना सेवामुक्त केले होते. मात्र, त्यानंतर लगेचच २८ फेब्रुवारी रोजी विमानतळ बंद झाल्यामुळे हे सर्व कामगार कुवैतमध्येच अडकून पडले. अचानक वेतन बंद झाल्याने आणि भविष्यातील अनिश्चिततेमुळे या कामगारांच्या मानसिक व आर्थिक परिस्थितीवर अत्यंत गंभीर परिणाम झाला होता.
या बिकट परिस्थितीची माहिती कुवैतमध्ये अडकलेले संघटनेचे कार्यकर्ते कालूराम गर्ग यांच्या माध्यमातून अखिल भारतीय ठेका मजदूर महासंघापर्यंत पोहोचली. या प्रश्नाचे गांभीर्य ओळखून महासंघाचे सरचिटणीस सचिन मेंगाळे यांनी तातडीने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय श्रम मंत्री मनसुख मांडवीय यांच्याशी पत्रव्यवहार केला. तसेच, भारतीय दूतावासामार्फत त्वरित हस्तक्षेप करून कामगारांना सुरक्षित मायदेशी आणण्याची जोरदार मागणी त्यांनी केली होती.
महासंघाच्या या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे आणि भारत सरकारच्या प्रयत्नांमुळे २८ मार्च रोजी संबंधित कंपनीने कामगारांच्या परतीबाबत अधिकृत घोषणा केली. यानुसार पहिल्या टप्प्यातील ४८ कामगारांना भारतीय दूतावासाकडून परतीसाठी मंजुरी मिळाली असून, हे कामगार येत्या आठवड्याभरात सौदी अरेबियामार्गे भारतात दाखल होणार आहेत. उर्वरित कामगारांना त्यांच्या सेवामुक्तीचा दिनांक आणि व्हिसा प्रक्रियेनुसार टप्प्याटप्प्याने भारतात पाठविण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
संबंधित कंपनीने सर्व कामगारांना संयम राखण्याचे आवाहन केले असून, स्वदेश परतीचा मार्ग मोकळा झाल्याचे समजताच अडकलेल्या कामगारांसह त्यांच्या कुटुंबीयांमध्येही समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या तात्काळ आणि सकारात्मक कार्यवाहीबद्दल अखिल भारतीय ठेका मजदूर महासंघाने भारत सरकार आणि भारतीय दूतावासाचे विशेष आभार मानले आहेत. आखाती देशांमध्ये काम करणाऱ्या भारतीय कामगारांनी कोणत्याही परिस्थितीत मनोधैर्य खचू न देता दूतावासाच्या सातत्याने संपर्कात राहावे, असे आवाहन महासंघाचे सरचिटणीस सचिन मेंगाळे यांनी केले आहे. तसेच, आखातातील भारतीय कामगारांच्या सुरक्षिततेसाठी महासंघ सदैव प्रयत्नशील असल्याची ग्वाहीही त्यांनी दिली आहे.













