तेहरान: इस्त्रायल आणि अमेरिकेने इराणवर केलेल्या भीषण बॉम्बफेडीत शेकडो निष्पाप नागरिकांचा बळी गेला असून, यामध्ये २०० हून अधिक चिमुकल्यांचा समावेश असल्याचा खळबळजनक दावा इराणचे परराष्ट्र मंत्री सय्यद अब्बास अराघची यांनी केला आहे. सोमवारी १६ मार्च २०२६ रोजी रात्री अराघची यांनी आपल्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवरून ही माहिती प्रसिद्ध केली आहे. या हल्ल्यांमुळे पश्चिम आशियातील परिस्थिती अत्यंत स्फोटक झाली असून, इराणने आता या युद्धाला सहकार्य करणाऱ्या आपल्या शेजारील राष्ट्रांनाही थेट इशारा दिला आहे.

​परराष्ट्र मंत्री अराघची यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, इस्त्रायल आणि अमेरिकेच्या संयुक्त फौजांनी इराणच्या नागरी वस्त्यांना लक्ष्य करून मोठा नरसंहार घडवून आणला आहे. धक्कादायक बाब म्हणजे, इराणच्या शेजारील काही राष्ट्रे जिथे अमेरिकन लष्करी तळ आहेत, ती राष्ट्रे या हल्ल्यांना केवळ परवानगीच देत नाहीत, तर या कत्तलीला प्रोत्साहनही देत असल्याचा दावा त्यांनी केला आहे. “ज्या देशांनी आपल्या जमिनीचा वापर इराणवर हल्ले करण्यासाठी दिला आहे, त्यांनी आपली भूमिका तातडीने स्पष्ट करावी,” अशा कडक शब्दांत अराघची यांनी संबंधित राष्ट्रांना सुनावले आहे.

​या भीषण हवाई हल्ल्यांमुळे इराणमध्ये मोठ्या प्रमाणावर जीवित व वित्तहानी झाली असून, मृतांचा आकडा सातत्याने वाढत आहे. विशेषतः लहान मुलांच्या मृत्यूच्या वृत्ताने जगभरातून संताप व्यक्त केला जात आहे. या पार्श्वभूमीवर, इराण आता प्रत्युत्तरादाखल मोठी लष्करी कारवाई करण्याच्या तयारीत असल्याचे संकेत मिळत आहेत. इराणच्या या आक्रमक भूमिकेमुळे आणि शेजारील राष्ट्रांवर केलेल्या थेट आरोपांमुळे आखाती देशांमधील राजनैतिक संबंध कमालीचे ताणले गेले असून, या संघर्षाचे रूपांतर मोठ्या युद्धात होण्याची भीती जागतिक स्तरावर व्यक्त केली जात आहे.