।। जनसेवा हीच ईश्वरसेवा ।।

प्रतिनिधी: जगदीप वनशिव | कणकवली

कणकवली : संत परंपरेतील समता, समाजप्रबोधन आणि लोकाभिमुख विचारांचा जागर घडविण्याच्या उद्देशाने सिंधुदुर्ग जिल्हा हरिजन समाज सेवा संघाच्या वतीने ‘संतश्रेष्ठ श्री चोखामेळा महाराज पुण्यतिथी–समाधी दिन सोहळा’ तसेच संत गाडगेबाबा शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी जयंती वर्षानिमित्त ‘संत गाडगेबाबा प्रबोधन परिषद २०२६’चे आयोजन करण्यात आले आहे.

ही परिषद शनिवार, दि. २ मे २०२६ रोजी सकाळी ९.३० वाजता ल. गो. सामंत विद्यालय, हरकुळ बुद्रुक (सोनारवाडी), ता. कणकवली, जि. सिंधुदुर्ग येथे संपन्न होईल.

‘संत चोखोबा ते संत गाडगेबाबा : समतेचा आणि समाज प्रबोधनाचा लोकाभिमुख प्रवास’ हा परिषदेचा मुख्य विषय असून संत परंपरेतील विचारांची आधुनिक संदर्भात मांडणी केली जाणार आहे. या कार्यक्रमाला संत चोखामेळा अध्यासन केंद्राचे संस्थापक सचिन पाटील, उपजिल्हाधिकारी बालाजी शेवाळे, संत साहित्य अभ्यासक डॉ. मुरहरी केळे आदींची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.

मान्यवरांची उपस्थिती

याशिवाय संदेश ऊर्फ गोट्या सावंत, मनोज रावराणे, आनंद राजाराम ठाकूर, डॉ. सुहास पावलकर, हर्षदा वाळके, दिव्या पेंडणेकर, दिनकर ऊर्फ राजू पेंडणेकर, बाबासाहेब वर्देकर, बाळू पाटील आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. परिषदेत संत चोखामेळा आणि संत गाडगेबाबा यांच्या समतेच्या आणि मानवतेच्या विचारांचा सखोल उहापोह करण्यात येईल.

राज्यव्यापी उपक्रम

संत गाडगे महाराज यांच्या १५०व्या जयंती वर्षानिमित्त राज्यभर विभागवार अशा परिषदांचे आयोजन करण्यात येत आहे. यातून स्वच्छता, शिक्षण, अंधश्रद्धा निर्मूलन आणि व्यसनमुक्ती या विषयांवर जनजागृती केली जाणार आहे.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संघाचे अध्यक्ष आनंद तांबे, कार्याध्यक्ष संतोष तांबे, सचिव संदीप तांबे आणि विश्वस्त अविनाश अभंगराव यांच्यासह सर्व कार्यकारिणी सदस्य परिश्रम घेत आहेत. या परिषदेस नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे