बावधन पोलिसांचे ‘महाळुंगे’ मध्ये कडक आदेश
पुणे (प्रतिनिधी):
महालुंगे गाव आणि परिसरातील वाढती गुन्हेगारी व सुरक्षिततेचा विचार करून, बावधन पोलीस ठाण्याच्या वतीने सर्व घरमालकांसाठी कठोर नियमावली जाहीर करण्यात आली आहे. आपल्या घरात किंवा सदनिकेत राहणाऱ्या भाडेकरूंचे पोलीस व्हेरिफिकेशन (Police Verification) न करणाऱ्या घरमालकांवर आता थेट भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम २२३ अन्वये गुन्हा दाखल करण्याचा इशारा वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल विभुते यांनी दिला आहे.
१० दिवसांची अंतिम मुदत
बावधन पोलिसांनी महालुंगे गावातील सर्व घरमालक आणि सोसायट्यांना लेखी नोटीस बजावली आहे. अनेक घरमालकांनी अद्यापही आपल्या भाडेकरूंची माहिती पोलिसांना सादर केलेली नाही, ही बाब गांभीर्याने घेत पोलिसांनी ही अंतिम नोटीस दिली आहे. नोटीस प्राप्त झाल्यापासून १० दिवसांच्या आत सर्व कागदपत्रे पोलीस ठाण्यात सादर करणे बंधनकारक आहे.
का आवश्यक आहे व्हेरिफिकेशन?
पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात वाढते शहरीकरण आणि औद्योगिक क्षेत्रामुळे बाहेरील जिल्ह्यातून व राज्यातून अनेक नागरिक वास्तव्यास येतात. सुरक्षेच्या कारणास्तव, आपल्या घरात राहणारी व्यक्ती कोण आहे, तिची पार्श्वभूमी काय आहे, याची नोंद पोलिसांकडे असणे आवश्यक आहे. अनेकदा गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले लोक ओळख लपवून भाड्याने राहतात, अशा घटना टाळण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे.
कारवाईचा इशारा
मुदत संपल्यानंतरही ज्या घरमालकांनी टाळाटाळ केली असेल, त्यांच्यावर कोणतीही पूर्वसूचना न देता कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. त्यामुळे महालुंगे व परिसरातील सर्व घरमालकांनी त्वरित बावधन पोलीस ठाण्याशी संपर्क साधून आपले ‘भाडेकरू व्हेरिफिकेशन’ पूर्ण करावे, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.