पुणे :
दिल्लीमध्ये ‘नीट’ (NEET) परीक्षेच्या मुद्यावर न्याय मागणारे आणि शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलिसांकडून झालेल्या अमानुष लाठीचार्जच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश (बाळासाहेब) आंबेडकर यांनी मंगळवारी, २३ जुलै रोजी ‘महाराष्ट्र बंद’ची हाक दिली आहे. “न्यायाची मागणी करणाऱ्या विद्यार्थ्यांवर जेव्हा बळाचा वापर केला जातो, तेव्हा गप्प राहणे हा पर्याय असू शकत नाही,” अशी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत ॲड. आंबेडकरांनी राज्यातील सर्व समविचारी पक्ष, विद्यार्थी संघटना आणि नागरिकांना या बंदमध्ये एकजूट होऊन सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
सोशल मीडियावर संतापाची लाट; ‘जनरल डायर’ आणि ‘हिटलरशाही’वर थेट प्रहार
विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ पुकारण्यात आलेल्या या बंदची मोहीम सोशल मीडियावर अत्यंत तीव्र करण्यात आली आहे. वंचित बहुजन आघाडीच्या अधिकृत पेजेसवरून शेअर करण्यात आलेल्या पोस्टर्स आणि व्हिडिओंनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. एका व्हायरल पोस्टरमध्ये चक्क पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो लष्करी गणवेशात (ज्यावर भाजपचे कमळ आहे) संपादित करून “जनरल डायर पुन्हा जिवंत झाला” असा मथळा देण्यात आला आहे. यात एका विद्यार्थिनीची गचांडी पकडणाऱ्या पोलिसाची विदारक दृश्ये दाखवत या घटनेची तुलना थेट जालियनवाला बागेतील हत्याकांडाशी करण्यात आली आहे. तर दुसऱ्या एका पोस्टरमध्ये “अमानुष पोलीस मारहाणी विरोधात, RSS हिटलरशाही सरकारच्या निषेधार्थ २३ जुलै रोजी महाराष्ट्र बंद” असा थेट एल्गार पुकारण्यात आला असून, ‘लोकशाही वाचवा! संविधान वाचवा!!’ असा नारा देण्यात आला आहे.
“हा लोकशाहीच्या आणि राष्ट्राच्या भविष्याचा प्रश्न”
या महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी आपल्या अधिकृत निवेदनातून आपली भूमिका अत्यंत स्पष्टपणे मांडली आहे. त्यांनी म्हटले आहे की, “हा लढा प्रत्येक तरुणाच्या निर्भयपणे आपला आवाज उठवण्याच्या अधिकाराचे रक्षण करण्याचा आहे. हा आपल्या मुलांच्या, आपल्या लोकशाहीच्या आणि आपल्या राष्ट्राच्या भविष्याचा प्रश्न आहे.”
त्यांनी जनतेला साद घालत पुढे म्हटले आहे की, “चला, आपण एकजूट होऊया आणि असा स्पष्ट संदेश देऊया की, महाराष्ट्रातील जनता विद्यार्थ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे आणि अन्याय व पोलिसांच्या दडपशाहीच्या विरोधात आहे. मी सर्व समविचारी पक्ष, विद्यार्थी आणि समाजातील सर्व स्तरांतील नागरिकांना आवाहन करतो की, त्यांनी एकत्र येऊन २३ जुलैच्या ‘महाराष्ट्र बंद’ला पाठिंबा द्यावा.”
डिजिटल प्लॅटफॉर्मवर #महाराष्ट्र_बंद ट्रेंडिंग
सध्या एक्स (ट्विटर), फेसबुक, व्हॉट्सॲप आणि इन्स्टाग्रामवर वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांकडून आणि विद्यार्थ्यांकडून #23_जुलै_महाराष्ट्र_बंद, #महाराष्ट्र_बंद, #Students आणि #NEETExam हे हॅशटॅग्स मोठ्या प्रमाणावर ट्रेंड केले जात आहेत. विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर आणि पोलिसांच्या क्रूरतेवर आवाज उठवण्यासाठी पुकारण्यात आलेल्या या ‘महाराष्ट्र बंद’ला राज्यातील जनता आणि इतर राजकीय पक्ष कसा प्रतिसाद देतात, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून आहे.













