मुंबई, (विशेष प्रतिनिधी) : विधानपरिषद निवडणुकीच्या निकालानंतर राज्यातील राजकीय वातावरण कमालीचे तापले असून, आरोप-प्रत्यारोपांच्या फेऱ्या सुरू झाल्या आहेत. यातच, महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी अंतर्गत पातळीवर भारतीय जनता पक्षालाच (भाजप) मदत केल्याचा खळबळजनक आरोप वंचित बहुजन आघाडीच्या राज्य प्रवक्त्या उत्कर्षाताई रूपवते यांनी केला आहे. “महाविकास आघाडीच्या नेत्यांनी भाजपला पडद्यामागून मदत करण्यात यश मिळवले,” असा थेट टोलाही त्यांनी लगावला आहे.
आपली भूमिका स्पष्ट करताना वंचित बहुजन आघाडीच्या राज्य प्रवक्त्या उत्कर्षाताई रूपवते म्हणाल्या की, नुकत्याच झालेल्या विधानपरिषद निवडणुकीत भाजपला फायदा कसा होईल आणि त्यांना कशी मदत करता येईल, याचाच पद्धतशीर प्रयत्न महाविकास आघाडीतील काँग्रेस, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) या तिन्ही प्रमुख पक्षांनी केला आहे. केवळ प्रयत्नच केला नाही, तर भाजपला निवडणुकीत मदत पोहचवण्यात या पक्षांना पूर्णपणे यश आले आहे, हे अत्यंत दुर्दैवी आहे.
पुढे बोलताना त्यांनी मतदानाच्या आकडेवारीवर बोट ठेवले. ज्या मतदारसंघांमध्ये किंवा भागांमध्ये महाविकास आघाडीचे चांगल्या प्रकारे मतदान होते आणि त्यांचे वर्चस्व होते, नेमक्या त्याच ठिकाणी महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवारांना मते मिळाली नाहीत. मविआची मते फुटून ती थेट भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांच्या पारड्यात कशी गेली? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. जिथे मविआ मजबूत होती, तिथे भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षाला मते मिळणे हे मविआच्या छुप्या खेळीचेच निदर्शक आहे, असे रूपवते यांनी म्हटले आहे.
वंचित बहुजन आघाडीने नेहमीच महाविकास आघाडी आणि भाजप यांच्यातील या छुप्या साट्यालोट्यावर आणि अंतर्गत तडजोडींवर उघडपणे भाष्य केले आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने मविआचा खरा चेहरा जनतेसमोर आला असून, भाजपला थेट फायदा पोहोचवण्याचे काम या तिन्ही पक्षांनी मिळून केले असल्याचे उत्कर्षाताई रूपवते यांनी स्पष्ट केले. त्यांच्या या जाहीर आरोपामुळे आता महाविकास आघाडी विरुद्ध वंचित बहुजन आघाडी असा नवा राजकीय कलगीतुरा रंगण्याची शक्यता निर्माण झाली आहे.












