More

    “फूट पाडणे थांबवा, अन्यथा कार्यालयांसह दुकानांवरही धडक देऊ”; प्रकाश आंबेडकरांचा RSS ला थेट इशारा

    Published on:

    ​“यावेळी परवानगी घेणार नाही, थेट रस्त्यावर उतरू”; ‘एक्स’ (Twitter) वरील संतप्त पोस्टची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा

    ​मुंबई (विशेष प्रतिनिधी):

    वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश (बाळासाहेब) आंबेडकर यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर (RSS) गंभीर आरोप करत अत्यंत आक्रमक शब्दांत थेट इशारा दिला आहे. “आरएसएसने अनुसूचित जातींमध्ये फूट पाडणे थांबवले नाही, तर समाज यावेळी कोणताही विचार करणार नाही किंवा आंदोलनाची परवानगी घेणार नाही, थेट आरएसएसच्या दारात पूर्ण ताकदीनिशी धडक देईल,” असा संतप्त इशारा आंबेडकरांनी दिला आहे. त्यांनी आपल्या अधिकृत ‘एक्स’ (X) खात्यावरून याबाबतची पोस्ट केली असून, सध्या या पोस्टची राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे.

    ​“गेल्या वेळी ऑफिस सोडावे लागले, यावेळी बंदच पाडू”

    प्रकाश आंबेडकर यांनी आपल्या पोस्टमध्ये थेट आरएसएसच्या नागपूर मुख्यालयाचा संदर्भ देत निशाणा साधला आहे. ते म्हणाले, “आरएसएसच्या चड्डीधाऱ्यांना माझा इशारा आहे. गेल्या वेळी जेव्हा नागपुरात आंदोलन केले होते, तेव्हा तुम्हाला ऑफिस सोडून जावे लागले होते. यावेळी मात्र आम्ही ते बंदच पाडू. तसेही ही संपूर्ण संघटना अपंजीकृत (Unregistered) आहे.”

    ​व्यापाऱ्यांनाही दिला इशारा

    कार्यालयांवर धडक देण्यासोबतच, आरएसएसच्या विचारधारेशी जोडलेल्या व्यापाऱ्यांबाबतही आंबेडकरांनी आपल्या पोस्टमध्ये गंभीर विधान केले आहे. “लक्षात ठेवा, बाजारात तुमचे जेवढे दुकानदार आहेत, त्यांना समाजातील लोक ओळखतात. समाजाचे लोक त्यांच्या दारातही जातील,” असे म्हणत त्यांनी आपला संताप व्यक्त केला आहे.

    ​सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल

    प्रकाश आंबेडकरांनी या पोस्टसोबत एक ग्राफिकल इमेजही शेअर केली आहे, ज्यामध्ये ‘RSS’ हे नाव आणि संघाची जुनी ओळख असलेली ‘खाकी चड्डी’ फुली (Cross) मारून दर्शविण्यात आली आहे. अनुसूचित जातींमधील आरक्षणाच्या वर्गीकरणावरून आणि सद्य राजकीय परिस्थितीवरून समाजात निर्माण होत असलेल्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आंबेडकरांनी घेतलेली ही अत्यंत आक्रमक भूमिका आगामी काळात राजकीय आणि सामाजिक पातळीवर नवे वादळ निर्माण करण्याची शक्यता आहे.

    Related

    Leave a Reply

    Please enter your comment!
    Please enter your name here