नवी दिल्ली:
प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री तब्बूच्या (Tabu) नावाने सोशल मीडियावर व्हायरल होत असलेले अश्लील आणि आक्षेपार्ह AI (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) व्हिडीओ तात्काळ हटवण्याचे सक्त निर्देश दिल्ली उच्च न्यायालयाने (Delhi High Court) दिले आहेत. आपल्या ‘व्यक्तिमत्त्व अधिकारांचे’ (Personality Rights) उल्लंघन होत असल्याच्या तक्रारीवरून तब्बूने न्यायालयात धाव घेतली होती. या याचिकेची गंभीर दखल घेत न्यायालयाने गुगल, मेटा (फेसबुक, इन्स्टाग्राम), एक्स (X), रेडिट आणि इतर टेक प्लॅटफॉर्म्सना हा बदनामीकारक मजकूर ३६ तासांच्या आत हटवण्याचा अल्टिमेटम दिला आहे.
गुन्हेगारांची माहिती उघड करण्याचे आदेश
न्यायमूर्ती ज्योती सिंग यांच्या खंडपीठाने ६ ऑगस्ट रोजी या प्रकरणी महत्त्वपूर्ण अंतरिम आदेश दिला. केवळ वेबपेजेस आणि मजकूर हटवून चालणार नाही, तर हे कृत्य निनावीपणे करणाऱ्या आरोपींची ‘बेसिक सबस्क्रायबर इन्फॉर्मेशन’ आणि ‘आयपी लॉग’ (IP Log) माहिती येत्या तीन आठवड्यांत सादर करण्याचे निर्देशही न्यायालयाने संबंधित टेक कंपन्यांना दिले आहेत.
नेमका प्रकार काय आहे?
एआय (AI) तंत्रज्ञानाचा गैरवापर करून इंटरनेटवर आपले अश्लील फोटो आणि व्हिडीओ तयार केले जात असल्याचा दावा तब्बूने याचिकेत केला होता. याशिवाय, तिच्या नावाचा आणि प्रतिमांचा वापर करून अनधिकृत वस्तूंची (मर्चेंडाईज) विक्री करणे, तसेच तिच्या नावे कार्यक्रमांचे खोटे बुकिंग करून लोकांची आर्थिक फसवणूक करण्याचे प्रकारही उघडकीस आले होते. या सर्व प्रकारांवर कारवाई करण्याची मागणी अभिनेत्रीने केली होती.
‘प्रतिमा आणि ब्रँड व्हॅल्यूचे कधीही न भरून येणारे नुकसान’
सुनावणीदरम्यान न्यायालयाने तब्बूच्या चित्रपटसृष्टीतील योगदानाचे कौतुक करत महत्त्वपूर्ण निरीक्षण नोंदवले. “तब्बू ही गेल्या तीन दशकांपासून आपल्या अभिनयाने भारतीय आणि जागतिक स्तरावर स्वतःचा ठसा उमटवणारी जगप्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिची प्रतिमा, आवाज आणि नाव याला लोकांमध्ये एक वेगळी ओळख आहे,” असे न्यायालयाने स्पष्ट केले. इंटरनेटवरील अशा खोट्या आणि अश्लील मजकुरामुळे तिच्या प्रतिष्ठेचे आणि व्यावसायिक मूल्याचे कधीही भरून न येणारे नुकसान होत असल्याच्या दाव्याशी न्यायालयाने पूर्ण सहमती दर्शवली.
या प्रकरणाची पुढील सुनावणी आता ७ डिसेंबर रोजी होणार असून, तोपर्यंत तब्बूच्या नावाचा, प्रतिमेचा आणि आवाजाचा अनधिकृत व्यावसायिक वापर करण्यावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. या खटल्यात तब्बूच्या वतीने वरिष्ठ वकील स्वाती सुकुमार यांच्या टीमने बाजू मांडली, तर गुगल, मेटा, एक्स, ईबे, फ्लिपकार्ट, रेडिट आणि गोडॅडी या कंपन्यांच्या वतीने त्यांच्या अधिकृत वकिलांनी प्रतिनिधित्व केले.














