
विशेष प्रतिनिधी, वर्तमान महाराष्ट्र
मुंबई / पुणे:
राज्यात पीक विमा भरण्याची आज अंतिम मुदत असतानाच गेल्या दोन दिवसांपासून तांत्रिक अडचणींमुळे पीक विम्याचे सर्व्हर पूर्णपणे ठप्प झाले आहे. यामुळे राज्यातील लाखो शेतकरी पीक विम्याचा अर्ज भरण्यापासून वंचित राहण्याची तीव्र शक्यता निर्माण झाली आहे. या गंभीर परिस्थितीची तातडीने दखल घेत आमदार रोहित पवार यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला असून, सर्व्हरची अडचण दूर करून पीक विमा भरण्यासाठी तातडीने मुदतवाढ देण्याची मागणी केली आहे.
ट्रिगर हटवल्याने आणि बदलांमुळे अर्जांची संख्या घटली
यंदा सरकारने पीक विमा योजनेतून ‘ट्रिगर’ काढल्याने आणि योजनेत विविध बदल केल्याने शेतकऱ्यांमध्ये आधीपासूनच अनिश्चिततेचे वातावरण होते. या बदलांमुळे आतापर्यंत राज्यभरातून केवळ ३८ लाख शेतकऱ्यांनीच पीक विम्यासाठी अर्ज दाखल केले आहेत. त्यातच आता शेवटच्या टप्प्यात सलग दोन दिवस सर्व्हर डाऊन असल्याने उर्वरित शेतकऱ्यांना अर्ज भरणे अशक्य झाले आहे.
शेतकऱ्यांवर अन्याय करू नका; रोहित पवारांचे सरकारला आवाहन
यासंदर्भात आमदार रोहित पवार यांनी आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवरून सरकारचे लक्ष वेधले आहे.
”आधीच योजनेतील बदलांमुळे केवळ ३८ लाख शेतकऱ्यांनी अर्ज केला आहे. अशातही जर सर्व्हर डाऊन असल्यामुळे उर्वरित शेतकरी अर्ज भरू शकत नसतील, तर हा शेतकऱ्यांवर होणारा थेट अन्याय ठरेल. त्यामुळे सरकारने तत्काळ तांत्रिक अडचण दूर करावी आणि पीक विमा भरण्याची मुदत वाढवण्यासाठी केंद्र सरकारशी संपर्क साधावा,” अशी मागणी त्यांनी केली आहे.
मुख्यमंत्री आणि केंद्रीय कृषीमंत्र्यांकडे पाठपुरावा
आपल्या या मागणीत त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान यांना टॅग करत प्रशासनाने तात्काळ पावले उचलावीत, असे स्पष्ट केले आहे. शेवटच्या दिवशी सर्व्हर डाऊन झाल्याने राज्यातील बळीराजा चिंतेत सापडला असून, राज्य सरकार केंद्र सरकारशी संवाद साधून मुदतवाढ देते का, याकडे आता सर्व शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.


















