मंगळवार, 24 नोव्हेंबर 2026
जाहिरातीसाठी संपर्क
वर्तमान महाराष्ट्र
⌕
ब्रेकिंग न्यूज
राष्ट्रीय

देवदर्शनाला निघालेल्या भाविकांवर काळाचा घाला; मथुरेत कार-डंपर धडकेत चौघांचा अंत

​मथुरा (उत्तर प्रदेश) : देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या भरधाव कारने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या डंपरला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत दोन महिला आणि दोन चिमुकल्यांसह चौघांचा जागीच मृत्यू झाला असून, पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. मथुरा जिल्ह्यातील जैंत पोलीस ठाण्याच्या हद्दीत राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १९ वर (NH-19) ही हृदयद्रावक घटना घडली.

​पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मध्य प्रदेशातील भिंड जिल्ह्यातील दामो परिसरातील रहिवासी असलेले हे कुटुंब स्विफ्ट कारमधून बरसाना येथील दर्शन आटोपून महावन येथील रमणरेती येथे दर्शनासाठी जात होते. महामार्गावरील ‘राम धर्म कांटा’ परिसरात पोहोचले असता चालकाचे भरधाव कारवरील नियंत्रण सुटले आणि कार थेट रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या डंपरवर पाठीमागून आदळली. ही धडक इतकी भीषण होती की, कारचा पूर्णपणे चक्काचूर झाला.

​या अपघातात रूबी (वय ३२), ज्योती (वय ३०), कान्हा (वय १०) आणि रुद्र (वय ४) या चौघांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताचा मोठा आवाज ऐकून स्थानिक नागरिक आणि महामार्गावरून जाणाऱ्या प्रवाशांनी तात्काळ मदतीसाठी धाव घेत कारमध्ये अडकलेल्या जखमींना बाहेर काढले.

​घटनेची माहिती मिळताच जैंत पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाचही जखमींना तातडीने नजीकच्या सर्वोदय रुग्णालयात दाखल केले. यातील तिघांची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. पोलिसांनी चारही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले असून, अपघातग्रस्त वाहने बाजूला करून महामार्गावरील विस्कळीत झालेली वाहतूक सुरळीत केली आहे. मृतांच्या नातेवाईकांना या दुर्घटनेची माहिती देण्यात आली असून, पुढील कायदेशीर कारवाई सुरू असल्याची माहिती मथुरेचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक (SSP) श्लोक कुमार यांनी दिली.

वर्तमान महाराष्ट्र

आपली प्रतिक्रिया नोंदवा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत