27.9 C
Pune
बुधवार, ऑगस्ट 19, 2026

Buy now

spot_img
spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

Related News

सौरव गांगुली आणि त्यांच्या कुटुंबाला थेट ‘संपवून टाकण्याची’ धमकी; सुरक्षेत मोठी वाढ

कोलकाता / विशेष प्रतिनिधी:

भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार आणि बीसीसीआयचे (BCCI) माजी अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) आणि त्यांच्या पत्नी डोना गांगुली यांना एका पत्रातून जीवे मारण्याची गंभीर धमकी देण्यात आली आहे. या खळबळजनक प्रकारानंतर सौरव गांगुली आणि त्यांच्या कुटुंबाच्या सुरक्षेत तातडीने मोठी वाढ करण्यात आली असून, याप्रकरणी पोलिसांत अधिकृत तक्रार दाखल करण्यात आली आहे.

कार्यालयात उघडले गेले धमकीचे पत्र

मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी सौरव गांगुली यांच्या कार्यालयात एक पत्र उघडण्यात आले. इंग्रजी भाषेत लिहिलेल्या या पत्रात सौरव गांगुली आणि त्यांच्या कुटुंबाला थेट ‘संपवून टाकण्याची’ धमकी देण्यात आली आहे. कुटुंबाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या सहा महिन्यांपासून अशी पत्रे येत होती. सुरुवातीला कोणाचा तरी खोडसाळपणा असावा म्हणून याकडे दुर्लक्ष करण्यात आले. मात्र, अलीकडे आलेल्या पत्रांमध्ये अत्यंत हिंसक भाषेचा वापर करण्यात आल्याने कुटुंबाची चिंता वाढली आणि त्यांनी पोलिसांत धाव घेतली.

ठाकूरपुकूर पोलिसांत तक्रार; ‘अरुण कुमार’चा शोध सुरू

सौरव गांगुली यांचे कुटुंबीय आणि त्यांच्या खासगी सहाय्यकाने याप्रकरणी ठाकूरपुकूर (Thakurpukur) पोलीस ठाण्यात लेखी स्वरूपात तक्रार दाखल केली आहे. तसेच राज्याच्या सुरक्षा विभागालाही याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली आहे. तपासात हे पत्र कुरिअरच्या माध्यमातून सौरव गांगुली यांच्या घरी पाठवण्यात आल्याचे निष्पन्न झाले आहे.

​कुरिअरच्या पाकिटावर ‘अरुण कुमार’ असे नाव लिहिलेले असून, तो बेलघरिया (Belgharia) येथील रहिवासी असल्याचे नमूद करण्यात आले आहे. पोलिसांनी पत्रावर दिलेल्या फोन नंबरचा शोध घेतला असता, ‘ट्रू कॉलर’वरही (Truecaller) त्या नंबरवर ‘अरुण कुमार’ हेच नाव दिसत आहे. आता खरंच अरुण कुमार नावाच्या व्यक्तीने हे कृत्य केले आहे, की त्याच्या नावाचा गैरवापर करून कोणी खोडसाळपणा करत आहे, याचा सखोल तपास पोलीस करत आहेत.

धमक्यांचा जुना इतिहास

सौरव गांगुली यांना धमकी मिळण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही अशा घटना घडल्या आहेत:

  • २०१७: सौरव गांगुली यांना पश्चिम मिदनापूर जिल्ह्यातील एका विद्यापीठात होणाऱ्या कार्यक्रमात भाग न घेण्याची धमकी पत्राद्वारे देण्यात आली होती. याप्रकरणी पोलिसांनी एका वृद्ध व्यक्तीला अटक केली होती.
  • २००८: सौरव गांगुली यांच्या आईलाही अशाच प्रकारचे एक निनावी धमकीचे पत्र आले होते.

​वारंवार घडणाऱ्या या प्रकारांची गंभीर दखल घेत प्रशासनाने सौरव गांगुली आणि त्यांच्या कुटुंबाच्या सुरक्षेत वाढ केली असून, या धमकीमागे नेमका कोणाचा हात आहे, याचा पोलीस कसून तपास करत आहेत.