मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत सुरू असलेल्या ५.६० किमी रस्त्याचे काम अत्यंत निकृष्ट; ‘एशियन डेव्हलपमेंट बँके’च्या निधीचा अपव्यय, कंत्राटदारावर कारवाईची मागणी
वार्ता संकलन: राजकुमार धिवार
केज (विशेष प्रतिनिधी):
मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत केज तालुक्यातील राज्य मार्ग क्र. ६४ जवळ असलेल्या सावळेश्वर ते आवसगाव (इजिमा-१३३) या रस्त्याच्या सुधारणा कामात मोठ्या प्रमाणावर अनियमितता आणि निकृष्ट दर्जाचे काम होत असल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला आहे. कोट्यवधी रुपयांचा निधी खर्चून तयार होत असलेला हा रस्ता काम पूर्ण होण्याआधीच हाताने उखडत असल्याने, या संपूर्ण प्रकरणाची सखोल तांत्रिक चौकशी करावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
पावणे चार कोटींचा निधी आणि ५ वर्षांची हमी!
या रस्त्याची एकूण लांबी ५.६० किलोमीटर असून, या कामासाठी ‘एशियन डेव्हलपमेंट बँक’ (ADB) कडून अर्थसहाय्य मिळाले आहे. माहिती फलकानुसार, ‘पॅकेज क्र. ADBBEE II 07’ अंतर्गत या कामासाठी तब्बल ३८८.०६५ लाख रुपये (सुमारे पावणे चार कोटी) इतका घसघशीत निधी मंजूर करण्यात आला आहे. हे काम ‘मे. सिद्धेश्वर कन्स्ट्रक्शन, धाराशिव’ या कंत्राटदाराला देण्यात आले असून, काम पूर्ण झाल्यानंतर ५ वर्षे देखभाल-दुरुस्तीची हमी असल्याचे फलकावर नमूद आहे. मात्र, काम पूर्ण करण्याची मुदत २३ ऑगस्ट २०२५ असली तरी, त्याआधीच रस्त्याची दयनीय अवस्था झाल्याने या ‘हमी’वरच मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
हाताने उखडतेय डांबर, तांत्रिक निकषांना हरताळ

प्रत्यक्ष रस्त्याच्या कामाची पाहणी केली असता, अनेक ठिकाणी रस्त्याचे काम अत्यंत निकृष्ट पद्धतीने झाल्याचे उघडकीस आले आहे. रस्त्यावरील डांबर आणि खडी अक्षरशः हाताने उखडत असल्याचे विदारक चित्र आहे. कामाच्या तपशीलानुसार ५० मिमी जाडीचा एम.पी.एम. आणि २० मिमी जाडीचे डांबरी अस्तीकरण करणे अपेक्षित असताना, रस्त्यावर वापरण्यात आलेले साहित्य, डांबरीकरणाची जाडी आणि रस्त्याची मजबुती याबाबत तांत्रिक निकषांचे सर्रास उल्लंघन झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
तांत्रिक चौकशी करून कारवाई करा
शासकीय निधीचा असा वारेमाप अपव्यय होऊ नये आणि नागरिकांना दर्जेदार रस्ता मिळावा, यासाठी या संपूर्ण कामाची तत्काळ स्वतंत्र तांत्रिक समितीमार्फत (Technical Audit) तपासणी करण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. कामाचे मोजमाप व वापरलेल्या साहित्याची गुणवत्ता तपासून यात दोष आढळल्यास संबंधित कंत्राटदार (सिद्धेश्वर कन्स्ट्रक्शन) आणि बीडच्या मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेचे कार्यकारी अभियंता व इतर जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी आक्रमक भूमिका स्थानिक नागरिकांनी घेतली आहे. संबंधित विभागाने या आरोपांची गांभीर्याने दखल घेत तातडीने प्रत्यक्ष पाहणी करून आपला चौकशी अहवाल सार्वजनिक करावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
कंत्राटदार व अधिकाऱ्यांशी संपर्क होऊ शकला नाही
या गंभीर प्रकरणाबाबत आणि ग्रामस्थांच्या आरोपांबाबत कंत्राटदार ‘मे. सिद्धेश्वर कन्स्ट्रक्शन’ किंवा बीडच्या ‘मुख्यमंत्री ग्राम सडक योजने’च्या संबंधित कार्यकारी अभियंत्यांची बाजू जाणून घेण्यासाठी प्रतिनिधीने संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांचा संपर्क होऊ शकला नाही. या बातमीसंदर्भात कंत्राटदार किंवा प्रशासनाला आपला अधिकृत खुलासा करायचा असल्यास, त्यांनी ‘वर्तमान महाराष्ट्र’च्या [email protected] या ईमेलवर किंवा ०७२७६७६१५१५ या क्रमांकावर WhatsApp द्वारे संपर्क साधावा. त्यांची बाजू प्राप्त झाल्यास तीही प्राधान्याने प्रसिद्ध केली जाईल.
संपादन: वर्तमान महाराष्ट्र (साप्ताहिक व न्यूज पोर्टल)
दिनांक: १३ ऑगस्ट २०२६
संपादक: श्री. उजगरे रवी रघुनाथ
संपर्क: ०७२७६७६१५१५




