प्रयागराजच्या अनुभवावरून अधिक पूर्वतयारीच्या प्रशासनाला सूचना; नाशिक कुंभमेळा नियोजनाचा घेतला आढावा
नाशिक : नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे पुढील वर्षी होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी प्राधिकरणासह जिल्हा प्रशासनाने केलेल्या नियोजनाचा राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी सविस्तर आढावा घेतला. आगामी कुंभमेळ्याच्या कालावधीत पावसाळा असल्याने प्रशासनासमोर नियोजनाचे मोठे आव्हान असणार आहे. त्यामुळे विशेषतः स्वच्छता आणि आरोग्याच्या सुविधांवर बारकाईने लक्ष देण्याचे निर्देश राज्यपालांनी दिले आहेत.
नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा विकास प्राधिकरणाच्या मुख्यालयात आयोजित बैठकीत राज्यपाल बोलत होते. यावेळी प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक संजय ऐनापुरे, पोलीस आयुक्त डॉ. संदीप कर्णिक, नाशिक महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाचे आयुक्त जलज शर्मा, मनपा आयुक्त मनीषा खत्री यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
बारा वर्षांनी होणाऱ्या या कुंभमेळ्याची माहिती समाजमाध्यमांमुळे सर्वदूर पोहोचत असल्याने यंदा भाविकांची संख्या नेहमीपेक्षा लक्षणीय राहील. त्यामुळे सूक्ष्म नियोजन करणे आवश्यक आहे. आतापर्यंत व्यापक नियोजन केले असले तरी, प्रयागराज कुंभमेळ्याचा अनुभव लक्षात घेऊन प्रशासनाने अधिक पूर्वतयारी करावी, अशी सूचना राज्यपालांनी यावेळी केली.
पायाभूत कामे वेळेत पूर्ण करा, AI चाही वापर करा
देश-विदेशातून येणाऱ्या कोट्यवधी भाविकांसाठी राज्य शासनाकडून मोठ्या प्रमाणावर निधी खर्चून पायाभूत सोयीसुविधा उभारल्या जात आहेत. ही सर्व कामे विहित वेळेत आणि दर्जेदार पद्धतीने पूर्ण करावीत. त्र्यंबकेश्वरचे महत्त्व लक्षात घेऊन दीर्घकालीन स्वरूपाची कामे हाती घ्यावीत. तसेच, सोहळ्याची भव्यता पाहता आधुनिक तंत्रज्ञान आणि आवश्यकतेनुसार कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) प्रभावी वापर करण्यावरही त्यांनी भर दिला.
नाशिकला मिळणार जागतिक ओळख
या प्रभावी नियोजनामुळे आगामी कुंभ सुंदर, स्मरणीय आणि भव्य होईल, ज्यामुळे जगात नाशिक-त्र्यंबकेश्वरची एक वेगळी ओळख प्रस्थापित होईल. उद्योग, पर्यटन आणि संस्कृती अशा विविध स्तरांवर नाशिकचा नावलौकिक उंचावेल, असा विश्वासही राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी व्यक्त केला. यावेळी प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. गेडाम आणि आयुक्त शेखर सिंह यांनी सुरू असलेल्या विविध विकासकामांची राज्यपालांना सविस्तर माहिती दिली.








