More

    शिवपूरमध्ये गोठ्याला आग : एका म्हशीचा मृत्यू, शेतकरी कुटुंबाचे लाखो रुपयांचे नुकसान

    Published on:

    ​शिरूर अनंतपाळ: शिरूर अनंतपाळ तालुक्यातील शिवपूरमध्ये गोठ्याला आग लागून एका म्हशीचा होरपळून मृत्यू झाल्याची अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. एका ठिणगीमुळे लागलेल्या या भीषण आगीत दुसरी म्हैसही गंभीर भाजली असून, शेतीचे साहित्य जळून खाक झाल्याने शेतकरी कुटुंबाचे लाखो रुपयांचे मोठे नुकसान झाले आहे.

    ​शिवपूर (ता. शिरूर अनंतपाळ) येथील शेतकरी सुमित्रा राजेंद्र तेलंगे यांचा शेतातील रस्त्याकडेला जनावरांचा गोठा आहे. अचानक एका ठिणगीमुळे या गोठ्याला भीषण आग लागली. आग इतकी भयंकर होती की, गोठ्यात बांधलेल्या दोन्ही म्हशी शंभर टक्के भाजल्या गेल्या. यामध्ये एका म्हशीचा जागीच तडफडून मृत्यू झाला, तर दुसरी म्हैस अत्यंत गंभीर अवस्थेत आहे. यासोबतच गोठ्यात ठेवलेले शेतीचे महत्त्वाचे साहित्यही आगीच्या भक्ष्यस्थानी पडून जळून खाक झाले आहे.

    ​सभापतींनी दिली घटनास्थळी भेट; मदतीचे आश्वासन

    या दुर्दैवी घटनेमुळे सुमित्रा तेलंगे आणि त्यांच्या कुटुंबावर अचानक मोठे आर्थिक संकट कोसळले आहे. या घटनेची माहिती मिळताच शिरूर अनंतपाळ पंचायत समितीचे सभापती संजय सूर्यवंशी यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत नुकसानीची पाहणी केली. त्यांनी महसूल प्रशासनाला घटनास्थळाचा तातडीने पंचनामा करण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या आहेत.

    ​तसेच, नुकसानग्रस्त तेलंगे कुटुंबीयांची भेट घेऊन सभापतींनी त्यांचे सांत्वन केले व त्यांना धीर दिला. शासनाच्या माध्यमातून या नुकसानग्रस्त शेतकरी कुटुंबाला शक्य ती सर्व आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी आपण स्वतः पाठपुरावा करू, असे ठोस आश्वासनही सभापती संजय सूर्यवंशी यांनी यावेळी दिले.

    Related

    Leave a Reply

    Please enter your comment!
    Please enter your name here