More

    पुणे: ‘भारतीय जनगणना २०२७’च्या पहिल्या टप्प्याला सुरुवात; पुणे महानगरपालिका आयुक्तांचे नागरिकांना सहकार्याचे आवाहन

    Published on:

    ​पुणे: प्रतिनिधी

    भारतीय जनगणना २०२७ च्या पहिल्या टप्प्याला १६ मे २०२६ पासून अधिकृतपणे सुरुवात झाली असून हा टप्पा १५ जून २०२६ पर्यंत सुरू राहणार आहे. या पार्श्वभूमीवर, पुणे महानगरपालिका आयुक्त तथा प्रधान जनगणना अधिकारी यांनी सर्व पुणेकरांना जनगणना कर्मचाऱ्यांना आवश्यक ते सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. शहरातील सर्व निवासी घरे, वसाहती, व्यापारी आस्थापना, व्यापारी संकुले तसेच गृहसंकुलांनी (Housing Societies) जनगणना कर्मचाऱ्यांना प्रवेश देऊन प्रक्रियेत सहभागी व्हावे, असे प्रशासनातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.

    ​अशी असेल जनगणनेची प्रक्रिया:

    • ​स्वयं नोंदणी क्रमांक (SE ID): जनगणना कर्मचारी (Enumerator) जेव्हा तुमच्या घरी किंवा आस्थापनेला भेट देतील, तेव्हा नागरिकांनी आपला स्वयं नोंदणी क्रमांक (SE ID) त्यांच्याकडे उपलब्ध करून देणे आवश्यक आहे.
    • ​अचूक माहिती देणे बंधनकारक: कर्मचाऱ्यांच्या भेटीदरम्यान विचारण्यात येणाऱ्या सर्व प्रश्नांची संपूर्ण आणि अचूक माहिती द्यावी. नागरिकांनी दिलेली हीच माहिती भविष्यातील देशाच्या धोरणांना आणि विकास योजनांना योग्य आकार देण्यास मदत करणार आहे.
    • ​माहितीची गोपनीयता: नागरिकांकडून संकलित केलेली सर्व माहिती पूर्णपणे सुरक्षित व गोपनीय राहणार आहे. ‘जनगणना अधिनियम, १९४८’ अंतर्गत या माहितीला कायदेशीर संरक्षण असून, कोणत्याही नागरिकाचे नाव किंवा ओळख सार्वजनिक केली जात नाही.
    • ​तपासणीसाठी वापर नाही: या माहितीचा वापर कर आकारणी, कर वसुली किंवा कोणत्याही प्रकारच्या शासकीय तपासणीसाठी केला जात नाही. या प्रक्रियेचा एकमेव उद्देश केवळ राष्ट्रनिर्माण हाच आहे.

    ​जनगणनेचे महत्त्व आणि फायदे:

    • ​नियोजनाचा अचूक आधार: देशाच्या आणि राज्याच्या भविष्यातील विविध लोककल्याणकारी धोरणांसाठी ही आकडेवारी अत्यंत महत्त्वाची ठरेल.
    • ​संसाधनांचे योग्य वाटप: लोकसंख्येच्या अचूक पाश्वभूमीवर सरकारी संसाधनांचे आणि निधीचे समन्यायी वाटप करणे शक्य होईल.
    • ​थेट योजनांचा लाभ: योग्य भागात, गरजेनुसार योग्य योजना राबवण्यास मदत होईल.
    • ​सर्वसमावेशक विकास: समाजातील सर्व घटकांचा विकास प्रक्रियेत समावेश सुनिश्चित करता येईल.

    ​”प्रत्येक नागरिकाने राष्ट्रनिर्मितीच्या या महायज्ञात सहभागी होऊन आपले योगदान दिल्याचा अभिमान बाळगावा,” असे आवाहन पुणे महानगरपालिकेकडून करण्यात आले आहे.

    Related

    Leave a Reply

    Please enter your comment!
    Please enter your name here