
बनसारोळा (प्रतिनिधी – राजकुमार धिवार):
केज तालुक्यातील बनसारोळा येथील सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलेले आणि शिक्षण क्षेत्रासाठी आपले आयुष्य वेचणारे प्राध्यापक डॉ. बाबासाहेब गोरे यांचा सेवापूर्ती गौरव सोहळा नुकताच मोठ्या उत्साहात व मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला. त्यांच्या या सेवानिवृत्तीमुळे शिक्षण क्षेत्रातील एका समर्पित आणि विद्यार्थीप्रिय प्राध्यापकाच्या कार्याचा गौरवपूर्ण अध्याय पूर्ण झाला आहे.
ग्रामीण भागातील विद्यार्थी उच्च शिक्षणापासून वंचित राहू नयेत, या उदात्त ध्येयाने प्रेरित होऊन डॉ. गोरे यांनी बनसारोळ्यासारख्या ग्रामीण परिसरात महाविद्यालय उभारण्यात मोलाचे योगदान दिले. त्यांच्या या अथक प्रयत्नांमुळे अनेक सर्वसामान्य कुटुंबांतील युवक-युवतींना गावाजवळच उच्च शिक्षणाची सुवर्णसंधी उपलब्ध झाली. शिक्षणाची गंगा ग्रामीण भागात पोहोचवून असंख्य विद्यार्थ्यांचे भविष्य घडविण्याचे कार्य त्यांनी अत्यंत निष्ठेने केले. विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, गुणवत्तापूर्ण शिक्षण, सामाजिक बांधिलकी आणि सुसंस्कार रुजविण्यात त्यांचा मोठा वाटा राहिला असून, त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक विद्यार्थ्यांनी विविध क्षेत्रांत यश संपादन करून समाजात आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे.
या सेवापूर्ती गौरव सोहळ्याला राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील अनेक दिग्गजांची विशेष उपस्थिती होती. यामध्ये प्रामुख्याने राज्याचे सहकार मंत्री ना. बाबासाहेब पाटील, बीडचे खासदार बजरंग बप्पा सोनवणे, मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण, मराठवाडा शिक्षक मतदारसंघाचे आमदार विक्रम काळे, केज विधानसभा मतदारसंघाच्या आमदार नमिताताई मुंदडा, अंबाजोगाई येथील अंबा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन रमेश आडसकर उपस्थित होते.
तसेच, शैक्षणिक क्षेत्रातील दिग्गज जसे की, स्वा. रा. ती. म. विद्यापीठ (नांदेड) व लखनौ विद्यापीठाचे माजी कुलगुरू सर्जेराव निमसे, शिवाजी विद्यापीठ (कोल्हापूर) चे माजी कुलगुरू व एमपीएससीचे माजी अध्यक्ष डॉ. देवानंद शिंदे यांनीही सोहळ्याची शोभा वाढवली. या सेवापूर्ती गौरव सोहळा संयोजन समितीचे अध्यक्ष म्हणून स्वा. रा. ती. म. विद्यापीठाचे माजी कुलगुरू मधुकरराव गायकवाड यांनी जबाबदारी पार पाडली.
याप्रसंगी उपस्थित मान्यवर, सहकारी प्राध्यापक, आजी-माजी विद्यार्थी आणि मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या ग्रामस्थांनी डॉ. बाबासाहेब गोरे यांचा यथोचित सत्कार केला व त्यांच्या पुढील वाटचालीस तसेच निरामय आणि दीर्घायुष्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
gh


















