More

    विलास घुले हत्येप्रकरणी केज तालुक्यात जनआक्रोश! निषेधार्थ केज शहर कडकडीत बंद, मुख्य आरोपीच्या अटकेसाठी नातेवाईक ठाम; मृतदेह पोलीस ठाण्याच्या आवारात

    Published on:

    ​छत्रपती शिवाजी महाराज चौकात तब्बल ४ तास रास्ता रोको; आरोपींना तात्काळ अटक करून फाशीची शिक्षा देण्याची आंदोलकांची मागणी

    ​केज (प्रतिनिधी):

    केज तालुक्यातील टाकळी येथील विलास घुले यांच्या निर्घृण हत्येच्या निषेधार्थ संपूर्ण तालुक्यात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. या धक्कादायक घटनेचा निषेध म्हणून मंगळवारी (दि. २३ जून) केज शहर कडकडीत बंद ठेवण्यात आले होते. तसेच शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात सकाळी १० वाजेपासून ते दुपारी २ वाजेपर्यंत तीव्र रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या घटनेमुळे तालुक्यात प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

    ​विलास घुले यांचा उपचारादरम्यान रविवार रोजी मृत्यू झाला होता. मात्र, घटनेला चार दिवस उलटूनही मुख्य आरोपीला अटक करण्यात आली नसल्याने ग्रामस्थ आणि नातेवाईकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. विलास घुले यांच्या खून प्रकरणातील सर्व आरोपींना तात्काळ अटक करून फाशीची शिक्षा द्यावी आणि या प्रकरणी ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात यावा, या प्रमुख मागण्यांसाठी हा बंद आणि रास्ता रोको पुकारण्यात आला होता. आंदोलनकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौक आणि टाकळी फाटा येथे चार ते पाच वेळा रस्ता रोको व ठिय्या आंदोलन करून प्रशासनाचा निषेध केला.

    ​महिलांचा आक्रोश आणि व्यापाऱ्यांचा पाठिंबा

    ​या आंदोलनादरम्यान मोर्चामध्ये सहभागी झालेल्या महिलांचा आक्रोश मन हेलावून टाकणारा होता. “आरोपींना फाशी द्या” अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला होता. केज शहर बंद आणि रास्ता रोको आंदोलनाला शहरातील व्यापारी, विविध सामाजिक संघटना, राजकीय पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक, टाकळी ग्रामस्थ आणि मित्रपरिवाराने मोठ्या संख्येने उपस्थित राहून पाठिंबा दिला. आंदोलनाचे गांभीर्य लक्षात घेता शहरात ठिकठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

    ​मुख्य आरोपीच्या अटकेशिवाय अंत्यविधी नाही!

    ​”जोपर्यंत मुख्य आरोपीसह सर्व सहआरोपींना पोलीस अटक करत नाहीत, तोपर्यंत आम्ही विलास घुले यांच्या पार्थिवावर अंतिम संस्कार करणार नाही,” असा ठाम निर्धार नातेवाईकांनी आणि टाकळी ग्रामस्थांनी केला आहे. या भूमिकेमुळे मंगळवारी रात्री उशिरापर्यंत विलास घुले यांचा मृतदेह केज पोलीस स्टेशनच्या प्रांगणात ठेवून ठिय्या आंदोलन सुरू होते. पोलीस ठाण्याच्या आवारात हजारो नागरिकांचा जनसमुदाय जमा झाला असून, रात्री उशिरापर्यंत ही गर्दी कमी न होता उलट वाढतच चालली असल्याचे पाहायला मिळाले.

    ​दरम्यान, या संपूर्ण प्रकरणाची पोलीस प्रशासनाकडून उच्चस्तरीय चौकशी सुरू असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. मात्र, आरोपींच्या अटकेच्या मागणीवर आंदोलक पूर्णपणे ठाम असल्याने पेच निर्माण झाला आहे.

    Related

    Leave a Reply

    Please enter your comment!
    Please enter your name here