Duplicate Colgate

नवी दिल्ली: दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेने (Crime Branch) एका नामांकित ब्रँडची बनावट टूथपेस्ट बनवणाऱ्या मोठ्या कारखान्याचा पर्दाफाश केला आहे. कंझावला भागात सुरू असलेल्या या कारखान्यावर गुप्त माहितीच्या आधारे छापा टाकण्यात आला असून, याप्रकरणी कारखान्याच्या मालकाला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.

​मिळालेल्या माहितीनुसार, दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेला कंझावला परिसरात बनावट टूथपेस्ट तयार करून बाजारात विकली जात असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांच्या विशेष पथकाने या कारखान्यावर अचानक छापा टाकला. या कारवाईदरम्यान ‘सेन्सोडाईन’ (Sensodyne) या प्रसिद्ध कंपनीच्या अधिकाऱ्यालाही पाचारण करण्यात आले होते. अधिकाऱ्याने घटनास्थळी असलेल्या मालाची तपासणी करून हा सर्व माल पूर्णपणे बनावट असल्याची पुष्टी केली.

​या मोठ्या कारवाईत पोलिसांनी तब्बल २०० किलो बनावट टूथपेस्ट जप्त केली आहे. यासोबतच टूथपेस्टची पॅकिंग आणि प्रिंटिंग करणारी यंत्रे, मोठ्या प्रमाणावर रिकाम्या ट्यूब्स आणि पॅकिंगचे इतर साहित्यही पोलिसांच्या हाती लागले आहे.

​नागरिकांच्या आरोग्याशी थेट खेळणाऱ्या या बनावट उत्पादनांच्या रॅकेटमागे आणखी कोणाचा हात आहे आणि हा बनावट माल दिल्लीत किंवा इतर राज्यांत कुठे कुठे वितरीत केला जात होता, याचा सखोल तपास आता दिल्ली पोलीस करत आहेत.