साकोळमध्ये काँग्रेस तर येरोळमध्ये भाजप विजयी; पंचायत समितीच्या चारही जागा महायुतीकडे






शिरूर अनंतपाळ (नितेश कांबळे):शिरूर अनंतपाळ तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचे निकाल काल (दि. ९) जाहीर झाले असून, मतदारांनी कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत न देता ‘चौरंगी’ व संमिश्र कौल दिला आहे. निवडणूक निर्णय अधिकारी अहिल्या गाठाळ व तहसीलदार किशोर यादव यांच्या उपस्थितीत हे निकाल घोषित करण्यात आले.जिल्हा परिषदेच्या दोन गटांत अटीतटीची लढत झाली. साकोळ गटात काँग्रेसचे माणिक गायकवाड यांनी ८,४९३ मते मिळवून भाजपाच्या उमेदवाराचा पराभव केला, तर येरोळ गटात भाजपाच्या तुळसाबाई लोंढे यांनी ७,३१२ मते घेत दणदणीत विजय मिळवला.पंचायत समितीच्या चार गणांमध्ये मात्र महायुतीचे वर्चस्व राहिले. साकोळ गणातून भाजपाच्या मीनाताई लांडगे आणि हिप्पळगाव गणातून भाजपाचे संजय सूर्यवंशी विजयी झाले. येरोळ गणात राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) पूनम चव्हाण, तर हिसामाबाद गणात शिवसेनेचे (शिंदे गट) हमीद सय्यद यांनी बाजी मारली.गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या या चुरशीच्या लढतीत काँग्रेसला एक जिल्हा परिषद गट राखता आला असला, तरी पंचायत समितीत भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादीने जोरदार मुसंडी मारली आहे.












