sandeep-pathak-emotional-speech-majalgaon-gurukrupa-annual-gathering-news
चित्रांकन: वर्तमान महाराष्ट्र

वर्तमान महाराष्ट्र वृत्तसेवा

माजलगाव: “आम्ही लहान होतो, त्यावेळी जाती-धर्माच्या भिंती फार खुज्या होत्या. मात्र, मागच्या काळात अनेकांनी त्यावर विटा रचून त्या माणसापेक्षाही मोठ्या केल्या आहेत. आपल्याला आता त्या भिंती तोडून आपली माती, माणसं आणि नाती जपावी लागतील,” असे अत्यंत भावनिक आवाहन प्रसिद्ध अभिनेते संदीप पाठक यांनी येथे केले.

​माजलगाव येथील ‘गुरुकृपा’ शिक्षण समूहाच्या वार्षिक स्नेहसंमेलनाचा समारोप सोहळा नुकताच पार पडला, याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. या सोहळ्याला प्रा. स्नेहल पाठक, संजय मालानी, डॉ. विनोद काकडे, व्यंकटेश वैष्णव, पांडुरंग उगले, डॉ. रंगनाथ गोळेकर, डॉ. भांगरे आणि गुरुकृपा समूहाचे डॉ. यशवंत राजेभोसले यांची प्रमुख उपस्थिती होती.

आई-वडिलांना कर्जबाजारी करू नका; संदीप पाठक यांचा कानमंत्र

IMG 20260315 WA0015

​विद्यार्थ्यांशी संवाद साधताना संदीप पाठक यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. ते म्हणाले की, “कितीही मोठे झालात तरी आपल्या मातीला आणि आई-वडिलांना विसरू नका. हेच लोक तुमचे पाय जमिनीवर ठेवण्यास मदत करतात.” आजच्या विवाह पद्धतीवर भाष्य करताना त्यांनी सांगितले की, आई-वडिलांना कर्जबाजारी करून लग्नावर कोट्यवधी रुपये खर्च करण्याची पद्धत बदलण्याची गरज आहे. तसेच, हातात दगड घेऊन कुणाचे तरी रक्त सांडण्यापेक्षा, रक्तदान करून कुणाचा तरी जीव वाचवा, हाच खरा इथल्या मातीचा संस्कार असल्याचे त्यांनी नमुद केले.

​याप्रसंगी डॉ. यशवंत राजेभोसले यांनी संदीप पाठक यांच्या जुन्या आठवणींना उजाळा देत गुरुकृपा समूहाचा यशस्वी प्रवास मांडला. तर संजय मालानी यांनी विद्यार्थ्यांनी आपल्या मैत्रीचा परीघ वाढवण्यासोबतच कोठे थांबायचे याचे भान ठेवावे, असे सांगितले. डॉ. विनोद काकडे यांनी या संस्थेतून परिपूर्ण माणूस निर्माण व्हावा, अशी अपेक्षा व्यक्त केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. प्रज्वल म्हस्के यांनी केले, तर सूत्रसंचालन ज्ञानेश्वर सोळंके यांनी केले.

‘वऱ्हाड’ ने उडविले हास्याचे कारंजे

​समारोप प्रसंगी संदीप पाठक यांनी ‘वऱ्हाड निघालंय लंडनला’ या जगप्रसिद्ध एकपात्री प्रयोगातील काही निवडक प्रसंग सादर केले. त्यांच्या अस्सल मराठमोळ्या शैलीतील सादरीकरणामुळे संपूर्ण परिसर टाळ्या, शिट्ट्या आणि हास्याच्या कारंजांनी न्हाऊन निघाला होता.

​या सोहळ्याला प्रकाश राजेभोसले, नंदिनी राजेभोसले, डॉ. वैशाली काकडे, डॉ. प्रियंका राजेभोसले, प्राचार्य अमित बिंदू, प्राचार्य मुकेश बाबू यांच्यासह पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ताज्या मराठी बातम्या आणि अशाच प्रेरणादायी घडामोडींसाठी ‘वर्तमान महाराष्ट्र’ वाचत राहा.