Republican Sena Protest Pune Municipal Corporation Vartman Maharashtra

अनधिकृत बांधकामांना अभय देणाऱ्या अभियंत्यांना निलंबित करा; ‘छावा क्रांतिवीर सेने’चाही आंदोलनाला जाहीर पाठिंबा

पुणे (प्रतिनिधी):

पुणे महानगरपालिका क्षेत्रातील विविध झोनमध्ये सुरू असलेल्या अनधिकृत बांधकामांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करणाऱ्या आणि भ्रष्टाचारात लिप्त असलेल्या अधिकाऱ्यांविरोधात रिपब्लिकन सेना युवक आघाडी, पुणे शहरच्या वतीने महापालिका मुख्य प्रवेशद्वारासमोर आजपासून बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे. या आंदोलनामुळे महापालिका प्रशासनात मोठी खळबळ उडाली असून, जोपर्यंत दोषी अधिकाऱ्यांवर कडक कारवाई होत नाही, तोपर्यंत मागे हटणार नाही, असा पवित्रा कार्यकर्त्यांनी घेतला आहे.

पुणे महानगरपालिका अधिकाऱ्यांची चौकशी करा

​रिपब्लिकन सेना युवक आघाडीचे पुणे शहराध्यक्ष अजयभाऊ भालशंकर आणि शहराचे सरचिटणीस दत्ताभाऊ शेंडगे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात येत आहे. आंदोलनकर्त्यांच्या म्हणण्यानुसार, झोन क्रमांक २ आणि ६ मधील काही अधिकाऱ्यांनी अनधिकृत बांधकामांच्या तक्रारींकडे सातत्याने दुर्लक्ष केले आहे. प्रामुख्याने अधीक्षक अभियंता प्रवीण शेडे, अभियंता नेवाळे, कनिष्ठ अभियंता समीर गडे आणि शिंदे साहेब यांच्यावर तात्काळ निलंबनाची कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.

छावा क्रांतिवीर सेनेचा जाहीर पाठिंबा

या आंदोलनाला छावा क्रांतिवीर सेनेचे प्रदेश मुख्य संघटक दिनकर कोतकर यांनी घटनास्थळी भेट देऊन आपला जाहीर पाठिंबा व्यक्त केला. यावेळी बोलताना कोतकर म्हणाले की, “पुणे महानगरपालिका प्रशासनातील काही अधिकारी सामान्य करदात्यांच्या पैशावर डल्ला मारत असून अनधिकृत बांधकामांना पाठबळ देत आहेत. या भ्रष्ट कारभारामुळे पुण्याची वाट लागत असून, या अधिकाऱ्यांची चौकशी झालीच पाहिजे.”

विविध तक्रारी प्रलंबित

आंदोलनकर्त्यांनी पुराव्यानिशी सांगितले की, कोथरुड, हिंजणे खुर्द, शिवाजीनगर आणि वडगाव बुद्रुक येथील अनधिकृत बांधकामांबाबत वारंवार पत्रव्यवहार करूनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. या आंदोलनात रिपब्लिकन सेना माथाडी कामगार शहराध्यक्ष अरबाज पठाण, महासचिव भीमराव सोनवणे, शहर उपाध्यक्ष अशोक खरात यांच्यासह अनेक पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत.