सौजन्य: वंचित बहुजन आघाडी

पुणे: (प्रतिनिधी)

“सत्तेचा उपयोग प्रजेच्या उद्धारासाठी आणि नैतिक उत्थानासाठी असावा,” असा अजरामर आदर्श निर्माण करणारे महान सम्राट अशोक यांची जयंती आज मोठ्या उत्साहात साजरी होत आहे. मानवासोबतच मुक्या प्राण्यांसाठीही दवाखाने उघडणारे आणि रस्ते, विहिरी, वृक्षारोपणासारखी लोककल्याणकारी कामे करणारे ते जगातील पहिले ‘कल्याणकारी राजा’ मानले जातात.

​सम्राट अशोक यांनी युद्ध आणि हिंसेचा त्याग करून तथागत गौतम बुद्धांच्या शांती आणि अहिंसेच्या विचारांचा स्वीकार केला. त्यांनी केवळ भारतातच नव्हे, तर जगभरात धम्माचा प्रचार आणि प्रसार केला. भारताच्या तिरंग्यावरील ‘अशोक चक्र’ हे त्यांच्याच गतिशील, न्यायपूर्ण आणि प्रगतशील विचारांचे प्रतीक आहे.

​वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सम्राट अशोक यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करण्यात आले आहे. शांती, अहिंसा आणि मानवकल्याणाचा जयघोष करणाऱ्या या महामानवाचे विचार आजही समाजाला दिशा देणारे आहेत. त्यांच्या या न्यायप्रिय विचारांना उजाळा देऊन समतावादी समाज निर्माण करण्याचा संकल्प आजच्या दिवशी व्यक्त केला जात आहे.