More

    रिपब्लिकन सेनेची बीडमध्ये २९ मार्च रोजी जिल्हास्तरीय संवाद बैठक; नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष डॉ. सुशील सूर्यवंशी यांचा होणार नागरी सत्कार

    Published on:

    ​बीड: रिपब्लिकन सेनेच्या संघटनात्मक बांधणीला गती देण्यासाठी आणि आगामी वाटचालीची रणनीती ठरवण्यासाठी येत्या २९ मार्च २०२६ रोजी बीडमध्ये जिल्हास्तरीय भव्य संवाद बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. बीड येथील शासकीय विश्रामगृह येथे दुपारी २ वाजता ही बैठक पार पडणार असून, यादरम्यान नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष डॉ. सुशील सूर्यवंशी यांचा विशेष सत्कारही करण्यात येणार आहे.

    ​रिपब्लिकन सेनेचे सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांनी संपूर्ण महाराष्ट्रातील जिल्हा व तालुका कार्यकारिण्या बरखास्त करून नवीन पक्षबांधणीचे आदेश दिले आहेत. याच प्रक्रियेचा भाग म्हणून डॉ. सुशील सूर्यवंशी यांची महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. या निवडीमुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, बीड जिल्ह्याच्या बैठकीत नूतन कार्यकारिणीची घोषणा होण्याची शक्यता आहे.

    ​या महत्त्वपूर्ण बैठकीचे नेतृत्व रिपब्लिकन सेनेचे नेते विजय साळवे करणार आहेत. याप्रसंगी परळी, अंबाजोगाई, केज, गेवराई, माजलगाव, शिरूर, धारूर यासह जिल्ह्यातील सर्व तालुक्यांतील इच्छुक पदाधिकारी आणि आंबेडकर विचारांच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन पुरुषोत्तम (गोटू) वीर यांनी केले आहे.

    ​रिपब्लिकन सेनेचा विस्तार संपूर्ण महाराष्ट्रभर मजबूत करण्याच्या दृष्टीने बीडमधील ही बैठक अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. येथूनच पक्षबांधणीच्या नव्या पर्वाची सुरुवात होणार असल्याचा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.

    Related

    Leave a Reply

    Please enter your comment!
    Please enter your name here