पुणे/रांजे (प्रतिनिधी):

नव्या काळातील आव्हाने स्वीकारून ‘चितळे बंधू’ने जागतिक स्तरावर आपला ठसा उमटवला आहे. चितळे बंधूंसारख्या प्रगत आणि निर्यातभिमुख खाद्य उद्योगांना जागतिक बाजारपेठेत अधिक सक्षम करण्यासाठी शासन पूर्ण सहकार्य करेल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

​भोर तालुक्यातील रांजे येथे उभारण्यात आलेल्या ‘चितळे बंधू व्हिजन पार्क’चे उद्घाटन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाले, त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, आमदार भीमराव तापकीर, सिद्धार्थ शिरोळे, शंकर मांडेकर, तसेच चितळे परिवारातील इंद्रनील चितळे, गोविंद चितळे, श्रीकृष्ण चितळे आणि केदार चितळे उपस्थित होते.

आधुनिकता आणि पारदर्शकतेचा संगम

​व्हिजन पार्कमधील सुविधांची पाहणी केल्यानंतर मुख्यमंत्री म्हणाले की, “या पार्कमध्ये स्वच्छता आणि शुद्धतेच्या बाबतीत कोणतीही तडजोड न करता मानवी हस्तक्षेपाविना चालणारी अत्याधुनिक यंत्रणा उभारली आहे. परदेशी यंत्रांमध्ये स्वतःच्या अनुभवातून बदल करून ही यंत्रणा सज्ज करणे आणि नूतनीकरणीय ऊर्जेचा वापर करणे, ही चितळे बंधूंची दूरदृष्टी दर्शवते.” विशेषतः येथील ‘निरीक्षण गॅलरी’मुळे ग्राहकांना उत्पादनाचे टप्पे पाहता येणार असून, यामुळे उद्योगात पारदर्शकता निर्माण होईल, असेही त्यांनी नमूद केले.

खाद्य संस्कृती हीच ‘सॉफ्ट पॉवर’

​भारताच्या वैविध्यपूर्ण खाद्यसंस्कृतीचा उल्लेख करताना मुख्यमंत्री म्हणाले की, “अन्न ही एक मोठी ‘सॉफ्ट पॉवर’ आहे. ज्याप्रमाणे चिनी किंवा फ्रेंच पदार्थांना जगात मागणी आहे, तसेच भारतीय पारंपारिक पदार्थ जागतिक ब्रँड म्हणून प्रस्थापित होत आहेत. चितळे बंधूंनी महाराष्ट्रीयन पदार्थांना जागतिक मानकांनुसार तयार करून ३५ पेक्षा जास्त देशांत पोहोचवले आहे, ही अभिमानास्पद बाब आहे.”

शासकीय पाठबळ मिळणार

​परदेशी नागरिक आता भारतीय चवीकडे आकर्षित होत आहेत. ही संधी ओळखून ‘निर्यातभिमुख’ खाद्य उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी शासन विशेष प्रयत्न करणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी जाहीर केले. चार पिढ्यांच्या कठोर परिश्रमातून हा ब्रँड उभा राहिला असून पुणेकरांनी त्यावर अतोनात प्रेम केले आहे, अशा शब्दांत त्यांनी चितळे परिवाराचे कौतुक केले.

​शाळा-महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी अशा औद्योगिक सहली आयोजित केल्यास त्यांना नव्या तंत्रज्ञानाची माहिती मिळेल, अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.