Bhau kadam
छायाचित्र भाऊ कदम

१००० भंतेजींना चीवरदान आणि १ लाख दिव्यांचा झगमगाट; विश्वशांतीसाठी चैत्यभूमीवर रंगणार ऐतिहासिक सोहळा

मुंबई (प्रतिनिधी):

जागतिक शांतता, प्रेम आणि करुणेचा संदेश देण्यासाठी यावर्षीची २५७० वी बुद्ध जयंती मुंबईतील दादर येथील चैत्यभूमीवर ‘वैशाख दीपोत्सव’ म्हणून मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येणार आहे. प्रसिद्ध मराठी अभिनेते भाऊ कदम यांनी या सोहळ्यात सहभागी होण्याचे आवाहन तमाम जनतेला केले असून, या निमित्ताने मुंबईचा समुद्रकिनारा १ लाख दिव्यांच्या प्रकाशाने उजळून निघणार आहे.

​या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे एकाच वेळी १ लाख दिवे प्रज्ज्वलित केले जाणार असून, १००० भंतेजींना सामूहिक ‘चीवरदान’ करण्यात येणार आहे. सध्या जगात सुरू असलेल्या युद्धांच्या पार्श्वभूमीवर, विश्वशांतीसाठी वंदन करणे आणि प्रज्ञा, शील, करुणा या बुद्धांच्या विचारांचा प्रसार करणे हा या दीपोत्सवाचा मुख्य उद्देश आहे.

भाऊ कदम यांचा सहभाग आणि संकल्प

या सोहळ्याबाबत माहिती देताना अभिनेता भाऊ कदम म्हणाले की, “यावर्षीची बुद्ध जयंती आपण ऊर्जाभूमी म्हणजेच चैत्यभूमीवर साजरी करूया. या ऐतिहासिक सोहळ्यात माझ्या परिवारातर्फे सुद्धा एक चीवरदान आणि १ लाख दिव्यांमध्ये माझाही एक दिवा मी अर्पण करणार आहे. आपण सर्वांनी या विश्वशांतीच्या उपक्रमात सहभागी व्हावे.”

  • दिनांक: ३० एप्रिल २०२६ (गुरुवार) रात्री ११:०० वाजल्यापासून.
  • समाप्ती: १ मे २०२६ (शुक्रवार) पहाटे ५:०० वाजेपर्यंत.
  • स्थळ: चैत्यभूमी समुद्रकिनारा, दादर, मुंबई.

​या दीपोत्सवाच्या माध्यमातून मैत्री आणि बंधुभावाचा नवा संदेश जनमानसात पोहोचवण्याचा निर्धार आयोजकांनी केला आहे. ३० एप्रिलच्या मध्यरात्रीपासून सुरू होणाऱ्या या सोहळ्यासाठी राज्यातील कानाकोपऱ्यातून अनुयायी येण्याची शक्यता असून, त्यादृष्टीने प्रशासकीय आणि सामाजिक स्तरावर जय्यत तयारी सुरू आहे.