[
भारतातील पहिली डॉक्टर-सेलिब्रिटी टी-20 लेदर बॉल क्रिकेट लीग असलेल्या ‘व्हाईटकोट सेलिब्रिटी क्रिकेट लीग 2026’ ची अधिकृत घोषणा गुरुवारी करण्यात आली. “जिथे आरोग्यसेवा, क्रिकेट आणि ग्लॅमर एकत्र येतात” या संकल्पनेवर आधारित ही अनोखी लीग डॉक्टरांच्या कर्तृत्वाला सन्मान देण्यासोबतच दर्जेदार क्रिकेट मनोरंजन देईल, अशी माहिती लीगचे संस्थापक व व्यवस्थापकीय संचालक सचिन वाघमारे यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी सीए अखिल कुमार आणि दीपेश शेरे उपस्थित होते. सचिन वाघमारे यांनी सांगितले की, ही भारतातील पहिली अशी लीग आहे, जिथे देशभरातील डॉक्टर आणि नामवंत सेलिब्रिटी एकाच व्यासपीठावर खेळताना दिसतील. या स्पर्धेसाठी देशभरातून 5 हजारहून अधिक डॉक्टरांनी नोंदणी केली आहे. डॉक्टरांच्या या व्यावसायिक क्रिकेट लीगसाठी देशभरात ग्राउंड ट्रायल्स पूर्ण झाल्या असून, निवड प्रक्रिया सध्या सुरू आहे. पुणे, मुंबई, अहमदाबादसह विविध शहरांमध्ये या चाचण्या मोठ्या उत्साहात घेण्यात आल्या. या लीगमध्ये 10 डॉक्टर-नेतृत्वाखालील संघ असतील. प्रत्येक संघात 1 ते 2 सेलिब्रिटी खेळाडू सहभागी होतील. 200 ते 500 निवडक डॉक्टरांचा भव्य लिलाव (ग्रँड ऑक्शन) पुण्यात पार पडणार असून, त्याचे थेट प्रक्षेपण केले जाईल. या लीगमध्ये केवळ भारतीय डॉक्टरच नव्हे, तर यूकेसह परदेशातील डॉक्टरही सहभागी होत आहेत. शहरी भागासोबतच ग्रामीण व खेडेगावातील डॉक्टर-खेळाडूंनी मोठ्या संख्येने नोंदणी केली आहे. अभिनेता सिद्धार्थ जाधव, संजय जाधव, प्रवीण तरडे यांसह अनेक नामवंत कलाकार लीगमध्ये सहभागी होणार आहेत. ‘व्हाईटकोट सेलिब्रिटी क्रिकेट लीग 2026’ ची प्राथमिक फेरी 4 ते 8 मे 2026 दरम्यान दोन गटात साखळी सामन्याने खेळवली जाईल. हे सामने पुण्यात होणार आहेत, तर उपांत्य फेरी आणि अंतिम सामने दुबई येथे खेळविण्यात येणार आहेत. सध्या मुंबई मेडस्टार्स, पुणे, अहमदाबाद, चेन्नई, पंजाब, दिल्ली, बेंगळुरू, हैदराबाद, जयपूर आणि कोलकाता या शहरांच्या नावाने संघ तयार करण्यात येत आहेत. आयोजकांनी स्पष्ट केले की, या लीगच्या माध्यमातून डॉक्टर्सना त्यांच्या वैद्यकीय सेवेपलीकडे जाऊन वेगळ्या स्वरूपात सन्मान मिळेल. डॉक्टर खेळाडू इतर कोणत्याही आयपीएल क्रिकेटपटूपेक्षा कमी नाहीत. त्यांचे कौशल्य, शिस्त आणि जिद्द यामुळे ही लीग देशातील क्रीडा विश्वात नवा इतिहास घडवेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला.
https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/pune/news/india-first-doctor-celebrity-t20-leather-ball-league-announced-137128982.html
मुख्यपृष्ठ वर्तमान महाराष्ट्र ताज्या बातम्या 'व्हाईटकोट सेलिब्रिटी क्रिकेट लीग 2026' ची घोषणा:भारतातील पहिली डॉक्टर-सेलिब्रिटी टी-20 लेदर बॉल...














