[%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%80%E0%A4%A4 039%E0%A4%97%E0%A4%A3%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A5%80 %E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%BE %E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A4%AF%E0%A4%BE039%E0%A4%9A%E0%A4%BE %E0%A4%97%E0%A4%9C%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF %E0%A4%AA%E0%A4%A5%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B0 %E0%A4%85%E0%A4%B5%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A4%B2%E0%A4%BE %E0%A4%97%E0%A4%A3%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A5%8B%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A4%B5 %E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE %E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B0%E0%A4%A5%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80
भारताच्या 77 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त कर्तव्य पथावर झालेल्या संचलनात आज विविध राज्य व मंत्रालयांच्या चित्ररथांनी भारताचा संपन्न सांस्कृतिक वारसा व विकसित भारताचे दर्शन घडवले. यात महाराष्ट्राच्या चित्ररथाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. गणेशोत्सवाच्या संकल्पनेवर आधारित हा चित्ररथ कर्तव्य पथावर येताच गणपती बाप्पा मोरयाचा एकच गजर ऐकू आला. भारताचा 77 व्या प्रजासत्ताक दिन आज देशभरात उत्साहात साजरा करण्यात येत आहे. प्रजासत्ताक दिनाचा मुख्य सोहळा नवी दिल्ली या देशाच्या राष्ट्रीय राजधानीतील कर्तव्य पथावर पार पडला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत ध्वजारोहण केल्यानंतर भारतीय सैन्यदलांनी चित्तथरारक कवायतींच्या माध्यमातून आपल्या शौर्याचे प्रदर्शन केले. यावेळी विविध राज्य व मंत्रालयाच्या चित्ररथांनी देशाचा संपन्न सांस्कृतिक वारसा व विकसित भारताचे दर्शन घडवले. यावेळी महाराष्ट्राच्या गणेशोत्सवावर आधारित चित्ररथाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. महाराष्ट्राने यंदा चित्ररथासाठी राज्यातील प्रमुख उत्सव असलेल्या गणेशोत्सवाचा विषय निवडला होता. संचलनासाठी तयार करण्यात आलेल्या खास चित्ररथात डोक्यावरून नेण्यात येणारी गणेशमूर्ती, गणेशमूर्तीचे रंगकाम करणारा कलाकार, ढोलपथकात ढोल वाजवणारी महिला, अष्टविनायकांच्या प्रतिकृती, गणेश मंदिराची प्रतिकृती असा जिवंत देखावा मांडण्यात आला होता. या चित्ररथासोबत असलेल्या कलाकारांनी उत्कृष्ट नृत्याविष्कार करून हा सोहळा पाहण्यासाठी आलेल्या प्रेक्षकांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. दुसरीकडे, कर्तव्य पथावरील संचालनामध्ये देशातील 17 राज्ये व 13 मंत्रालयांचे मिळून एकूण 30 चित्ररथ सहभागी झाले होते. यावेळी तिन्ही सैन्य दलांच्या जवानांनी थरारक प्रात्यक्षिकेही दाखवली. प्रजासत्ताक दिनाला प्रमुख पाहुणे म्हणून युरोपियन कौन्सिलचे अध्यक्ष अँटोनियो कोस्टा व युरोपियन कमिशनच्या अध्यक्षा उर्सुला वॉन डेर लेयेन उपस्थित होत्या. भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सैन्यदलांच्या जवानांचे अभिवादन स्वीकारले. तसेच संचलनात सहभागी झालेल्या कलाकारांच्या कलागुणांचे कौतुक केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रमुख पाहुण्यांना कर्तव्य पथावरील संपूर्ण कार्यक्रमाची व विविध चित्ररथामधून दाखवण्यात आलेल्या भारतीय संस्कृतीच्या वैशिष्ट्यांची माहिती दिली.
https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/news/maharashtra-republic-day-parade-ganesh-utsav-tableau-karyatya-path-137047741.html