[%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%A0 %E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A4%BE %E0%A4%AD%E0%A4%B0%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%B5 %E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE %E0%A4%A7%E0%A4%A1%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%A4 %E0%A4%AE%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%82%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4 %E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A4%BE%E0%A4%A3 %E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B0 %E0%A4%98%E0%A4%9F%E0%A4%A8%E0%A4%BE %E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%A8%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A7
पुण्यात पाषाण रस्त्यावर राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेच्या प्रवेशद्वारासमोर भरधाव वाहनाच्या धडकेत एका ज्येष्ठ महिलेचा मृत्यू झाला आहे. फेरफटका मारण्यासाठी बाहेर पडलेल्या या महिलेला धडक दिल्यानंतर वाहनचालक घटनास्थळावरून पसार झाला. आशा विजयकुमार पाटील (वय ७३, रा. अभिमानश्री हाऊसिंग सोसायटी, पाषाण रस्ता) असे मृत महिलेचे नाव आहे. याप्रकरणी अतुल विजयकुमार पाटील (वय ५२) यांनी चतु:शृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी पसार झालेल्या वाहनचालकाविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आशा पाटील दररोज सायंकाळी फेरफटका मारण्यासाठी बाहेर पडत असत. पाषाण रस्त्यावरून जात असताना राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेच्या (एनसीएल) प्रवेशद्वारासमोर त्यांना भरधाव वाहनाने धडक दिली. या अपघातात त्या गंभीर जखमी झाल्या. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु उपचारांपूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम भजनावळे यांनी घटनास्थळी भेट दिली असून, पसार झालेल्या वाहनचालकाचा शोध सुरू आहे. दरम्यान, पुणे-सोलापूर महामार्गावरील थेऊर फाटा परिसरातही एका पादचारी तरुणाचा भरधाव वाहनाच्या धडकेत मृत्यू झाला. २३ जानेवारी रोजी मध्यरात्री दीडच्या सुमारास ही घटना घडली. मृत तरुणाची ओळख अद्याप पटलेली नाही. तो सुमारे ३५ वर्षांचा असावा असा अंदाज आहे. या प्रकरणीही अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावरही एका भीषण अपघातात एकाचा मृत्यू झाला. रस्त्याच्या कडेला थांबलेल्या ट्रकवर मोटार आदळल्याने हा अपघात झाला. भीमा राजेंद्र जाधव (रा. धायरी) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. मोटारचालक शुभम सुनील डुबळे (वय २७, रा. धायरी) याने आंबेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुभम आणि भीमा हे दिवे घाटातील श्री कानिफनाथ मंदिरातून दर्शन घेऊन परतत होते. शनिवारी पहाटे पावणेतीनच्या सुमारास आंबेगाव परिसरातील बाबाजी पेट्रोल पंपासमोर रस्त्याच्या कडेला थांबलेल्या ट्रकला त्यांच्या मोटारीने धडक दिली. ट्रकचालकाने पाठीमागील दिवे सुरू न ठेवल्याने अंधारात ट्रक दिसला नाही. या अपघातात शुभम जखमी झाला, तर भीमाचा गंभीर दुखापतींमुळे मृत्यू झाला. ट्रकचालकाच्या निष्काळजीपणामुळे ही दुर्घटना घडल्याचे पोलिसांनी सांगितले.
https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/pune/news/pune-pashan-road-accident-senior-woman-death-driver-flees-137040715.html