[%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%81%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A4%B2%E0%A4%BE %E0%A4%95%E0%A4%B2%E0%A4%B9 %E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%A4 %E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%9F%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0 %E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%A4 %E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%B0 %E0%A4%97%E0%A4%9F%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE %E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%8C%E0%A4%B0 %E0%A4%B5%E0%A4%A1%E0%A5%87%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%BE %E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%95
अखेर चंद्रपूर काँग्रेसमधील विधिमंडळ नेते आणि आमदार विजय वडेट्टीवार आणि खासदार प्रतिभा धानोरकर यांच्यातील अंतर्गत कलह दिल्ली दरबारी मिटल्याचे समोर आले आहे. त्यानुसार चंद्रपूर महापालिकेचे महापौरपद धानोरकर गटाकडे, तर उपमहापौरपदी वडेट्टीवारांच्या समर्थकाची वर्णी लागणार आहे. या ठिकाणी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेलाही सत्तेत वाटा मिळणार आहे. गेले काही दिवस चंद्रपूर महापालिकेतील काँग्रेस बाबत संभ्रमाचे वातावरण होते. त्यात आमदार विजय वडेट्टीवार आणि खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या अंतर्गत वाद सुरू होता. मात्र, दिल्लीत काँग्रेस पक्षश्रेष्ठींशी चर्चा केल्यानंतर अखेरीस आज त्यावर तोडगा निघाला. चंद्रपूर वादावर विजय वडेट्टीवार यांनी पत्रकार परिषद घेतली. ते म्हणाले की, ‘महाराष्ट्र काँग्रेस आणि दिल्लीतून घेण्यात आलेल्या निर्णयानुसार खासदार प्रतिभा धानोरकर आणि गटनेता राजेश अरुण म्हणतील तो महापौर होईल.काँग्रेसचे गटनेता म्हणून राजेश अडूर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. उपमहापौरपदी आमचे वसंत देशमुख यांनी अर्ज भरला आहे. मात्र, आम्ही महापौर पदाचा अर्ज भरला नाही. तर धानोरकरांकडून चार महिलांनी अर्ज भरलेत. आज संध्याकाळी काँग्रेसची गटनोंदणी होणार आहे.’ वडेट्टीवार म्हणाले की, ‘उपमहापौर पदी अनुभवी आमचे समर्थक वसंत देशमुख यांनी अर्ज भरला, तर गटनेते पदी वडेट्टीवार समर्थक राजेश अडूर यांची नियुक्ती करण्यात आली. राजेश अडूर यांच्या नियुक्तीचे पत्र देखील पक्षाकडून अधिकृतरित्या विभागीय आयुक्तांना देण्यात आले आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून देखील आज महापौर पदी अर्ज दाखल करण्यात आला आहे. उपमहापौर पदी देखील खासदार धानोरकर यांच्या समर्थकांकडून अर्ज दाखल करण्यात आला आहे. याबाबत चर्चा होऊन अर्ज मागे घेण्यात येईल.’ वडेट्टीवार म्हणाले की, ‘सध्या काँग्रेसकडे 27 नगरसेवक असून जनविकास सेना पप्पू देशमुख यांचे 3 नगरसेवक काँग्रेसबरोबर आहेत. त्यांना MIM पक्षाने पाठिंबा दिल्याने ते 1 नगरसेवक जनविकास सेनेबरोबर आहे. बसपाने देखील काँग्रेसला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे सध्या 32 चे संख्याबळ असून अजून 2 नगरसेवकांच्या पाठिंब्याची आवश्यकता आहे. याबाबत सर्व स्तरावर चर्चा सुरू आहे. चंद्रपूर महापालिकेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला स्थायी समिती देण्याची तयारी काँग्रेसने दर्शवली असून, त्या पक्षातील पक्षश्रेष्ठींशी चर्चा सुरू असून अंतिम निर्णय लवकरच होईल. वडेट्टीवार म्हणाले की, ‘ राज्यात मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर वर एक टँकर कलंडल्यामुळे या मार्गावर तब्बल 32 तास वाहतुकीची मोठी कोंडी झाली. यातूनच राज्य सरकारचा विकास दिसत आहे. या घटनेतून सरकारची नाचक्की झाली आहे. चंद्रावर, मंगळावर जाण्याच्या गोष्टी करतात आणि द्रुतगती मार्गावरील वाहतूक कोंडीसाठी यंत्रणा नाही यातून सरकार किती कार्यक्षम आहे हे जनतेला दिसले.’ दरम्यान, महाराष्ट्र काँग्रेसचे विदर्भ प्रभारी कुणाल चौधरी म्हणाले की, ‘चंद्रपूरच्या जनतेने काँग्रेसला कौल दिला आहे. चंद्रपुरात काँग्रेसचा महापौर होईल. चंद्रपूरच्या विकासासाठी काँग्रेस काम करणार आहे,’ असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/mumbai/news/chandrapur-mahanagarpalika-mayor-post-dhanorkar-vadettywar-shiv-sena-137129901.html