sojai-foundation-awards-pune-jagdeep-vanshiv-news

राज्यस्तरीय काव्यमैफिलीने रसिक मंत्रमुग्ध; ज्येष्ठ साहित्यिक आणि पोलीस प्रशासनातील मान्यवरांची उपस्थिती

पुणे (प्रतिनिधी – जगदीप वनशिव):

चन्होली बुद्रुक येथील वडमुखवाडी परिसरात सोजाई आदिवासी महिला विकास फाउंडेशनच्या वतीने आयोजित “डॉ. बाबासाहेब आंबेडकर” राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा आणि “विचारांचा वारसा” काव्यमैफिल मोठ्या उत्साहात पार पडली. या कार्यक्रमात विविध क्षेत्रांतील मान्यवरांना गौरविण्यात आले असून, महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध निवेदक आणि रानकवी जगदीप वनशिव यांना यावर्षीचा ‘जीवनगौरव पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले.

संविधानाचे पूजन करून सोहळ्याचे उद्घाटन

अशोका व्हेज रेजन्सी येथे आयोजित या कार्यक्रमाचे उद्घाटन दिघी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांच्या हस्ते झाले. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस आणि संविधानास अभिवादन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. संस्थेच्या सचिव एड. जयश्री सोनवणे यांनी प्रास्ताविकात संस्थेच्या सामाजिक, शैक्षणिक आणि आरोग्यविषयक उपक्रमांची माहिती दिली. “महाराष्ट्रातील नवोदित साहित्यिकांना विचारपीठ मिळवून देणे आणि अन्यायाविरुद्ध वाचा फोडणे हाच आमचा ध्यास आहे,” असे त्यांनी नमूद केले.

साहित्यातून समाजप्रबोधन व्हावे: प्रमोद वाघ

उद्घाटक प्रमोद वाघ यांनी आपल्या भाषणात साहित्यिकांच्या जबाबदारीवर भाष्य केले. “समाजातील अत्याचार, भ्रष्टाचार आणि गुन्हेगारीला आळा बसवण्यासाठी साहित्यिकांनी परखड लेखन केले पाहिजे. संविधानामुळे आपल्याला समान अधिकार मिळाले असून, चालू घडामोडींवर जनजागृती करणे ही काळाची गरज आहे,” असे प्रतिपादन त्यांनी केले.

भावूक काव्यमैफिलीने जिंकली रसिकांची मने

कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि राष्ट्रपती पोलीस पदक मानकरी लोककवी सीताराम नरके यांनी ‘बाप माझा गळा तुळशीची माळ’ ही कविता सादर केली, ज्याने उपस्थित सर्व रसिकांना भाऊक केले. दुसऱ्या सत्रात गझलकार रज्जाक शेख यांच्या अध्यक्षतेखाली ‘विचारांचा वारसा’ ही काव्यमैफिल रंगली. यामध्ये ३० पेक्षा अधिक कवींनी आपल्या विविध रचना सादर केल्या. या काव्यमैफिलीचे सूत्रसंचालन रानकवी जगदीप वनशिव यांनी आपल्या बहारदार शैलीत केले.

​या सोहळ्याला सेलिब्रिटी ज्युरी अतुल गुंजाळ, संस्थेचे अध्यक्ष डॉ. प्रशांत चव्हाण, उपाध्यक्ष डॉ. ओमकार चव्हाण, खजिनदार द्रोपदी सोनवणे यांच्यासह साहित्य आणि सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. गजानन उफाडे यांनी पहिल्या सत्राचे सूत्रसंचालन केले.