Vm news

पुणे (प्रतिनिधी) :

राज्यातील क्रीडा संस्कृतीला गती देण्यासाठी आणि जागतिक दर्जाचे खेळाडू घडवण्यासाठी राज्य सरकारने ‘मिशन लक्ष्यवेध’ हा महत्वाकांक्षी उपक्रम हाती घेतला आहे. या अंतर्गत पुणे जिल्हा स्तरावर ‘क्रीडा प्रतिभा विकास केंद्र’ कार्यान्वित करण्यात येत असून, विविध खेळांतील पात्र खेळाडूंची निवड चाचणी १५ आणि १६ एप्रिल २०२६ रोजी आयोजित करण्यात आली आहे.

​या योजनेचा मुख्य उद्देश क्रीडा प्रशिक्षण व्यवस्था बळकट करणे, अत्याधुनिक पायाभूत सुविधा निर्माण करणे आणि खेळाडूंना क्रीडा वैद्यकशास्त्रासह करिअर मार्गदर्शन उपलब्ध करून देणे हा आहे. यासाठी देश-विदेशातील नामवंत संस्थांचे सहकार्यही घेतले जाणार आहे.

या खेळांसाठी होणार निवड :

पुणे जिल्हा स्तरावर ॲथलेटिक्स, हॉकी, शुटींग आणि रोईंग या चार क्रीडा प्रकारांसाठी केंद्रास मान्यता मिळाली आहे. प्रत्येक क्रीडा प्रकारासाठी २० खेळाडूंची निवड केली जाणार आहे. २५ वर्षांखालील (३१ डिसेंबर २०२६ पर्यंत) महाराष्ट्रातील खेळाडू या चाचणीसाठी पात्र असतील. ज्या खेळाडूंनी गेल्या दोन वर्षांत राज्यस्तरावर पदक मिळवले आहे किंवा राष्ट्रीय स्तरावर (SGFI, AITA, खेलो इंडिया) सहभाग नोंदवला आहे, अशांच्या कामगिरीचा विचार निवडीसाठी केला जाईल.

चाचणीचे ठिकाण व वेळ :

  • ॲथलेटिक्स, हॉकी व शुटींग : १५ व १६ एप्रिल, सकाळी १०.०० वाजता, शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे-बालेवाडी (वेटलिफ्टिंग हॉल), पुणे.
  • रोईंग : १५ व १६ एप्रिल, सकाळी ११.०० वाजता, आर्मी रोईंग नोड, सी.एम.ई., दापोडी.

असा करा अर्ज :

इच्छुक खेळाडूंनी १३ एप्रिल २०२६ पूर्वी dsopune6@gmail.com या ई-मेलवर आपले अर्ज सादर करावेत. अर्जासोबत जन्म दाखला, आधार कार्ड, अधिवास प्रमाणपत्र, मागील दोन वर्षांतील क्रीडा प्रमाणपत्रे आणि पालकांचे संमतीपत्र जोडणे अनिवार्य आहे. चाचणीच्या दिवशी मूळ कागदपत्रे आणि तीन फोटो सोबत ठेवणे आवश्यक आहे.

​अधिक माहितीसाठी सुरेश काकड (८८८८८०६१५८), मनीषा माळी (७३९१९६८१९२) किंवा अश्विनी हत्तरगे (७३८७८८०४२७) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे यांनी केले आहे.