निलंगा | प्रतिनिधी

​अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाच्या प्रस्तावाविरोधात आता निलंग्यात संतापाची लाट उसळली आहे. या प्रस्तावाचा निषेध करण्यासाठी ‘अनुसूचित जाती उपवर्गीकरण विरोधी कृती समिती, निलंगा’ यांच्या वतीने शासकीय विश्रामगृह येथे महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत उपवर्गीकरणाच्या निर्णयाला कडाडून विरोध दर्शवत ३० जुलै रोजी निलंगा येथे होणारा तालुकास्तरीय महामोर्चा अभूतपूर्व करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.

सामाजिक सलोखा राखण्याचे आवाहन

बैठकीत उपस्थित विविध समाजघटकांच्या प्रतिनिधींनी अनुसूचित जातींच्या घटनात्मक अधिकारांवर कोणताही आघात सहन केला जाणार नाही, असा इशारा दिला. उपवर्गीकरणामुळे अनुसूचित जातींच्या एकात्मतेवर परिणाम होण्याची तसेच सामाजिक न्यायाच्या तत्त्वांना धक्का पोहोचण्याची भीती व्यक्त करण्यात आली. महाराष्ट्र शासनाने हा निर्णय तत्काळ रद्द करून राज्यात सामाजिक सलोखा अबाधित ठेवावा, अन्यथा सरकारला दूरगामी परिणाम भोगावे लागतील, असा इशारा आंबेडकरवादी जनतेने दिला आहे. दोन्ही समाजात जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न सरकार करत असल्याचा सूरही यावेळी उमटला.

मोर्चासाठी व्यापक नियोजन

या आंदोलनाला चांभार, मातंग, ढोर, मुस्लिम, धनगर आणि ओबीसी समाजातील प्रतिनिधींनी जाहीर पाठिंबा दिला आहे. मोर्चा यशस्वी करण्यासाठी तालुक्यात ठिकठिकाणी जाहीर बैठकांचे आयोजन करण्यात येणार आहे. निलंगा शहर व तालुक्यातील प्रत्येक गावातून महिला, युवक, विद्यार्थी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी हजारोंच्या संख्येने सहभागी व्हावे, यासाठी व्यापक जनजागृती मोहीम राबविली जाणार आहे. तसेच, प्रत्येक भागातून वाहनांची व्यवस्था करण्याचे नियोजनही यावेळी करण्यात आले.

अनेक मान्यवरांची उपस्थिती

या बैठकीच्या अध्यक्षस्थानी विलास सूर्यवंशी होते. यावेळी रजनीकांत कांबळे, अंकुश ढेरे, प्रा. रोहित बनसोडे, धम्मानंद काळे, दाजीबा कांबळे, अर्जुनाप्पा कटके (ढोर समाज), डॉ. प्रमोद हातागळे (खाटिक समाज), सतीश कांबळे, उल्हास वाघमोडे (मातंग समाज), काशिनाथ जाधव, सुभाष भालके, रणवीर भालके, विजय जाधव (चर्मकार समाज), झटिंग (अण्णा) म्हेत्रे (धनगर समाज), शेख सिराज, हज्जू सय्यद (मुस्लिम समाज) यांच्यासह नागोराव गायकवाड, विजयकुमार सूर्यवंशी, प्रकाश गायकवाड, सूर्यकांत कांबळे, अंगद गवळी, प्रकाश कांबळे, दिगंबर सूर्यवंशी, देवदत्त सूर्यवंशी, अनंत कांबळे, बंटी कांबळे, शुभम सूर्यवंशी, सुभाष कांबळे, मोहन वाघमारे, तानाजी सुरवसे, प्रदीप सोनकांबळे, मुन्ना सुरवसे, रोहन सुरवसे, गौतम कांबळे, संदीप कांबळे, लहू ढेरे, प्रविण कांबळे, धनराज कांबळे, संजय हत्तरगे यांच्यासह विविध समाजघटकांचे पदाधिकारी व मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.