जयघोषातून थेट स्तब्धतेकडे! ४:५८ वाजता अवघा गुरुकुंज आश्रम नतमस्तक

​राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना लाखो भक्तांची मूक श्रद्धांजली; मोझरीत साकारला शिस्तबद्ध ‘मानवता दिन’

​विशेष वृत्त : वर्तमान महाराष्ट्र

तिवसा (अमरावती) : प्रतिनिधी, मनिष माहोरे

​मानवतेचे महान पुजारी, ग्रामविकासाचे दीपस्तंभ राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ५८ व्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त श्रीक्षेत्र गुरुकुंज आश्रम, मोझरी येथे भाविकांचा जनसागर लोटला होता. टाळ-मृदंगाच्या तालावर आणि ‘श्रीगुरुदेव’ नामाच्या जयघोषाने दुमदुमणारा परिसर सायंकाळी ठीक ४ वाजून ५८ मिनिटांनी एका क्षणात पूर्णपणे स्तब्ध झाला. महाद्वारावरील महाघंटेचा निनाद होताच लाखो भक्तांनी हात जोडून महासमाधीच्या दिशेने दोन मिनिटे मूक श्रद्धांजली अर्पण केली. सर्वधर्म समभावाचा आणि शिस्तबद्धतेचा प्रत्यय देणारा हा ‘मानवता दिन’ सोहळा देशातील एक अद्वितीय क्षण ठरला.

​अखिल भारतीय श्रीगुरुदेव सेवामंडळाच्या वतीने आयोजित या महोत्सवासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून तसेच देशभरातून हजारो दिंड्या, पालख्या आणि गुरुदेव भक्त मोझरीत दाखल झाले होते. ‘मज वेडची गुरुकुंजाचे। आवडतो मज कण कण तिथला।’ या राष्ट्रसंतांच्या भावोद्गारांची अनुभूती देत भाविकांनी भजन आणि संकीर्तनातून संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन टाकला.

​दोन तास भजनांतून ध्यानस्थ जनसमुदाय

दुपारी ३ वाजता महाद्वारावरील घंटीचा गजर आणि मुख्य मंडपात शंखनाद करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. ‘गुरुदेव हमारा प्यारा’ या अर्चना गीताने मौन श्रद्धांजली सोहळ्याची पार्श्वभूमी तयार केली. यानंतर ‘तुम बिन कौन है? अब नाथ तारलो’, ‘हम भारत की शान है’, ‘सच्चे सेवक बनेंगे हम’ आणि ‘जन्मोजन्मी हेची देई। विठोबाई माझे आई’ यांसारख्या राष्ट्रसंतांच्या प्रबोधनात्मक भजनांनी उपस्थित अथांग जनसमुदाय दोन तास अंतर्मुख होऊन ध्यानस्थ बसला होता. अध्यात्म आणि विज्ञानाची सांगड घालणाऱ्या तुकडोजी महाराजांच्या विश्वव्यापक कार्याची महती यावेळी शब्द आणि सुरांच्या माध्यमातून मांडण्यात आली.

​४:५८ ची अथांग शांतता; महामार्गही थांबला

मराठी पंचांगानुसार अश्विन वद्य पंचमीला (११ ऑक्टोबर १९६८) सायंकाळी ठीक ४ वाजून ५८ मिनिटांनी राष्ट्रसंतांचे महानिर्वाण झाले होते. या ऐतिहासिक क्षणाची स्मृती जागवत ५८ व्या वर्षीही अचूक ४:५८ वाजता महाघंटेचा गजर झाला आणि लाखो भक्तांनी एकत्र मौन पाळले. या क्षणी राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक काही काळासाठी थांबवण्यात आली होती, तसेच यात्रेतील सर्व दुकाने, भोंगे आणि ध्वनिक्षेपक बंद करण्यात आले होते. त्यामुळे महासमाधी परिसरात पसरलेली ती अथांग, नीरव शांतता प्रत्येक भक्ताच्या हृदयाला स्पर्श करून गेली.

​सर्वधर्म प्रार्थना आणि शांततेचा महासंकल्प

मौन श्रद्धांजलीनंतर राष्ट्रवंदना आणि राष्ट्रसंतांची आरती संपन्न झाली. जगात वाढणारा धर्मवाद, द्वेष आणि हिंसाचार संपवून समानता व बंधुभाव निर्माण करण्यासाठी सर्वधर्मियांनी यावेळी सामुदायिक प्रार्थनेच्या माध्यमातून जागतिक शांततेचा संकल्प केला. व्यासपीठावरून हिंदू, मुस्लिम, बौद्ध, जैन आणि ख्रिश्चन धर्माच्या धर्मगुरूंनी आपापल्या धर्मग्रंथांनुसार प्रार्थना करून सर्वधर्म समभावाचा संदेश दिला.

​मान्यवरांची उपस्थिती

या सोहळ्याला श्रीगुरुदेव सेवामंडळाच्या अध्यक्षा पुष्पा बोंडे, संचालक कीर्तीकुमार भांगडीया, सर्वाधिकारी प्रकाश वाघ, उपसर्वाधिकारी बाबाराव पाटील, सरचिटणीस जनार्दन बोथे, प्रचार प्रमुख गोपाल कडू यांच्यासह खासदार बळवंत वानखडे, माजी खासदार नवनीत राणा, आमदार राजेश वानखडे, माजी आमदार यशोमती ठाकूर, नाना महाराज, ॲड. सचिन देव, रामप्रियाजी, विजयादेवी, आरती वानखडे, प्रहारचे संजय देशमुख यांसह अनेक धार्मिक, सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

​या संपूर्ण भव्य आणि शिस्तबद्ध सोहळ्याचे नेटके नियोजन अखिल भारतीय श्रीगुरुदेव सेवामंडळाचे आध्यात्मिक विभाग प्रमुख डॉ. राजाराम बोथे यांनी केले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
22,900SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles