शिक्षण संवाद २०२६: शिक्षकांच्या अनुभवांना सर्वोच्च प्राधान्य; सकारात्मक सूचनांची प्रभावी अंमलबजावणी करणार – शिक्षणमंत्री दादाजी भुसे

15
Dadaji bhuse shikshan matri

मुंबई:

राज्यातील शिक्षण व्यवस्थेला अधिक गुणवत्तापूर्ण, विद्यार्थीकेंद्रित आणि परिणामकारक बनवण्यासाठी शिक्षकांच्या प्रत्यक्ष अनुभवांना आणि सूचनांना सर्वोच्च प्राधान्य दिले जाईल, अशी ग्वाही शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांनी दिली. शालेय शिक्षण विभागाच्या वतीने चर्नी रोड येथील ‘महाराष्ट्र राज्य जवाहर बालभवन’ येथे आयोजित ‘शिक्षण संवाद २०२६’ या विचारमंथन सोहळ्यात ते बोलत होते.

​या प्रसंगी शिक्षण आयुक्त सच्छिंद्रप्रताप सिंह, जवाहर बालभवनच्या संचालक नीता पाटील यांच्यासह राज्यातील शिक्षक, शिक्षणतज्ज्ञ, शिक्षणाधिकारी आणि शिक्षण क्षेत्राशी संबंधित विविध मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

​शिक्षकांचा अनुभव हाच भविष्यातील धोरणांचा आधार

​विचारमंथन सोहळ्यात उपस्थितांशी संवाद साधताना मंत्री दादाजी भुसे म्हणाले, “वर्गखोलीत काम करणाऱ्या शिक्षकांचा प्रत्यक्ष अनुभव हा शिक्षण विभागासाठी सर्वात मौल्यवान मार्गदर्शक आहे. आम्हाला शिक्षकांचे अनुभव, अडचणी आणि थेट सूचना ऐकायच्या आहेत. याच अनुभवांच्या पायावर भविष्यातील शैक्षणिक धोरणे अधिक सक्षम आणि परिणामकारक केली जातील.”

​शिक्षण हे केवळ ज्ञान देण्याचे माध्यम नसून सुसंस्कारित, जबाबदार आणि राष्ट्रप्रेमी नागरिक घडवण्याचे प्रभावी साधन असल्याचे सांगत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘विकसित भारत’ या संकल्पनेचा पुनरुच्चार केला. बालपणापासूनच विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती, सामाजिक बांधिलकी आणि राष्ट्रीय मूल्ये रुजविण्यावर शिक्षण व्यवस्थेने भर दिला पाहिजे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

​सकारात्मक शिफारसींची टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी

​मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य शासन विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षण व्यवस्थेच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध आहे. विचारमंथनातून समोर आलेल्या सर्व सकारात्मक सूचनांचा गांभीर्याने विचार करून त्यांची टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी करण्यात येईल. शिक्षकांच्या सक्रिय सहभागातूनच राज्याची शिक्षण व्यवस्था अधिक भविष्याभिमुख आणि भक्कम बनेल, असे आश्वासन शिक्षणमंत्र्यांनी दिले.

​विविध विषयांवर दिवसभर रंगले विचारमंथन

​या कार्यशाळेत दिवसभरात शिक्षण क्षेत्राशी संबंधित विविध महत्त्वपूर्ण विषयांवर विशेष चर्चासत्रांचे आयोजन करण्यात आले होते:

  • अध्ययन-अध्यापन आणि शैक्षणिक गुणवत्ता संवर्धन: उपक्रमशील शिक्षक दत्तात्रय वारे आणि सचिन उषा विलास जोशी यांनी मार्गदर्शन केले.
  • योग आणि अध्यात्म: ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज झगरे, पल्लवी आचार्य काटेकर आणि पद्मश्री उदय देशपांडे यांचे व्याख्यान पार पडले.
  • शालेय स्तरावर सैनिकी शिक्षण: सैनिक कल्याण विभागाचे उपसंचालक लेफ्टनंट कर्नल सतेश देवानराव हंगे (नि.) आणि एअर व्हेटरन विंग कमांडर एम. याग्नारामन यांनी मार्गदर्शन केले.
  • कला, क्रीडा आणि अभिनय उपक्रम: प्रसिद्ध लेखक संजय कळमकर आणि बालनाट्यकार राजीव तुलालवार यांनी आपले विचार मांडले.
  • राणी लक्ष्मीबाई आत्मरक्षा अभियान व शासकीय योजना: महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेचे उपसंचालक संजय डोलीकर आणि उपसंचालक (योजना) डॉ. वंदना वाहूळ यांनी विविध शासकीय योजनांची सद्यस्थिती, आव्हाने आणि भविष्यातील संधींविषयी सविस्तर माहिती दिली.